पाण्याच्या भीषण टंचाईमुळे अनेक कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:15 IST2016-01-21T01:15:16+5:302016-01-21T01:15:16+5:30

उन्हाळाची सुरुवात होण्यापूर्वीच गावात पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याने अनेक कुटुंब गाव सोडून बाहेरगावी वास्तव्यास जाण्याच्या तयारीत आहेत.

Due to the scarcity of water many families are ready to leave the village | पाण्याच्या भीषण टंचाईमुळे अनेक कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे अनेक कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत

माजरी: उन्हाळाची सुरुवात होण्यापूर्वीच गावात पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याने अनेक कुटुंब गाव सोडून बाहेरगावी वास्तव्यास जाण्याच्या तयारीत आहेत. मागील आठवड्यात दोन कुटुंब गाव सोडून गेलेत. भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावातील या शोकांतिकेला अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
मागील दोन महिन्यापासून गावात पाण्याची टंचाई संदर्भात देऊळवाडावासीयांनी वेळावेळी तक्रारी केल्यात. मात्र अद्यापही कुणीही मदतीला धावले नाही. संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे कायमचा कानडोळा केला काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या गंभीर स्थितीची साधी विचारपूससुद्धा झाली नाही. कसलीही कार्यवाही नाही. सदर प्रतिनिधीने गावास भेट दिली असता गावातील प्रत्येक वॉर्डात पाण्यासाठी महिलांची भटकंती दिसून येते. एक- दीड किमी अंतरावरुन शेतातील विहिर किंवा बोरवेलचे पाणी आणावे लागत आहे. ज्यांच्याकडे बैलगाडी आहे, ते बैलगाडीवर ड्रम भरुन आणतात. कशीबशी पाण्याची गरज भागवीतात. मात्र गरीब कुटुंबीयांचे काय? ज्या परिवारांकडे नळ नाही व हातपंपही नाही. केवळ सरकारी योजनांच्या भरोशावर आहे. अशांनी पाण्याची गरज कुठे व कशी भागवावी, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देऊळवाडा गावापासून दोन किमी अंतराव कोंढा नाला आहे. पूर्वी हा नाला बारमाही वाहत होता. मात्र यावर्षी दिवाळीनंतर या नाल्याचा प्रवाह थांबला. नाल्याच्या पात्रात काही ठिकाणी डबड्यात पाणी दिसून येते. परंतु उन्हाळ्यापर्यंत तिथेही पाणी नसेल., अशी स्थिती आहे. ही डबकी कोरडी झाल्यानंतर पशुधनास पाणी मिळेल की नाही, अशी भीती आतापासूनच निर्माण झाली आहे.
देऊळवाडा गावातील बहुतांश हातपंप बंद स्थितीत आहे. गावालगत असलेला छोटा तलाव (बोडी) पूर्णत: कोरडा पडला आहे. या तलावात कचरा- झाडेझुडपे दिसून येते. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून महिलांनी कपडे कुठे धुवायचे, जनावरांना पाणी कुठून द्यायचे, असा गंभीर प्रश्न आहे. देऊळवाडा गाव भद्रावती शहरापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. या गावास ऐतिहासीक वारसा आहे गावालगत टेकडी असून या टेकडीच्या पायथ्याशी भुयारात व टेकडीच्या टोकावर अनेक देव- देवतांची मंदिरे आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय जत्रा असते. यावेळी गावात विविध कार्यक्रम राबविले जातात. यात्रेला परिसरातील नागरिकांची गर्दी व गावतील प्रत्येक घरी पाहुणे असतात. गावातील भिषण पाणी टंचाई असल्यामुळे यात्राकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असणार की सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधी देऊळवाडातील पाणी प्रश्न सोडविणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. एकेकाळी देऊळवाडा पाण्याचा गाव म्हणून ओळखला जात होता. मात्र सद्यस्थितीत पाण्याअभावी अनेकांवर गाव सोडण्याची पाळी आली आहे.
संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी जातीने लक्ष घालून देउळवाडा येथे नळाद्वारे दररोज पाणी मिळेल, अशी तातडीने व्यवस्था करावी. गावालगत तलावाची स्वच्छता करुन वेकोलिद्वारा खाणीतील बाहेर जाणारे पाणी या बोडीत सोडावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the scarcity of water many families are ready to leave the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.