पावसामुळे बळीराजा सुखावला
By Admin | Updated: August 6, 2015 01:55 IST2015-08-06T01:55:57+5:302015-08-06T01:55:57+5:30
मागील एक महिन्यापासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

पावसामुळे बळीराजा सुखावला
संकट मात्र अद्यापही कायम : जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा
चंद्रपूर : मागील एक महिन्यापासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दिवसभरच पावसाची अधेमधे पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहे. दोन दिवसांच्या या पावसाने दिलासा मिळाला असला तरी आतापर्यंतचा पावसाचा लहरीपणा लक्षात घेता संकट मात्र अद्यापही कायमच आहे. आज बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाबाबत प्रारंभपासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.
जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांचे बरे होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या कोमेजून गेल्या. काहींनी गुंडांनी पिकांना पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न चालविला.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचीही स्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी शेतकरी साकडे घालू लागले होते. मात्र आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह दिसत नव्हती. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, काल ४ आॅगस्ट आणि आज चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सावली तालुका वगळता इतर तालुक्यात मुसळधार नसला तरी समाधानकारक पाऊस पडला. बुधवारी पुन्हा पावसाची रिपरिप अधेमधे सुरूच राहिली. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला आहे. मात्र अद्यापही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस केव्हाही दडी मारत असल्यामुळे खरीपावर संकट अद्यापही टळलेले नाही. (शहर प्रतिनिधी)
मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा थोडा का होईना, वाढला आहे. जुलै महिन्यात असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव हे प्रकल्प कोरडे पडले होते. आता मात्र केवळ आसोलामेंढा प्रकल्पच कोरडे आहे. बुधवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार घोडाझरी प्रकल्पात ७.१४ टक्के, नलेश्वर-१०.५९ टक्के, चंदई-६४.९९ टक्के, चारगाव-१२.९२ टक्के, अमलनाला-४७.९० टक्के, लभानसराड-३३.१४ टक्के, पकडीगुड्डम-६५.४४ टक्के, डोंगरगाव-७६.६६ टक्के, दिना-७६.९४ टक्के आणि इरई धरणात ४३.४८ टक्के जलसाठा आहे.