पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतोय दारूचा महापूर
By Admin | Updated: May 20, 2016 01:05 IST2016-05-20T01:05:36+5:302016-05-20T01:05:36+5:30
महाराष्ट्र शासनाने जनतेचे हित लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी लागून केली. या निर्णयाला तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतोय दारूचा महापूर
उदासीन धोरण : पोलिसांचा डीलरशी साठेलोटे असल्याचा संशय
आवाळपूर : महाराष्ट्र शासनाने जनतेचे हित लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी लागून केली. या निर्णयाला तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता मात्र याच जिल्ह्यात दारुचा महापूर पहावयास मिळतो आहे. महाराष्ट्र शासनाने दारुबंदीचा चांगला निर्णय घेतला असला तरी कोरपना तालुक्यात गावागावात दारु मिळत आहे. प्रशासन आणि पोलीस विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक बेरोजगारांसाठी दारुविक्री हा उत्तम व्यवसाय बनला आहे.
शासनाने गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार, दारुमुळे भरकटलेल्या तरुणांची संख्या कमी होणार, अशा वेगवेगळ्या हितकारी उद्देशाने दारुबंदी केली. मात्र दारुविक्री व्यवसायात लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई भरकटत चालली असून दारुविक्रीस पुढाकार घेत आहे. कोरपना तालुक्याला यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्याची सीमा लागून आहेत. या सीमेवरुन अवैध दारु वाहतुक फोफावली आहे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सर्रासपणे दारु विक्रेते दारुची अवैध वाहतूक करताना दिसून येत आहे. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन गावातील जनतेला जागृत करीत आहे. गावागावात जावून समिती गठीत करीत करण्याचे कार्य करीत आहे.
पोलीस विभागाचे दारु विक्रेत्यासोबत साटेलोटे असल्याने आणि कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने दारु विक्रेत्याची माहिती देण्यास अनेक नागरिक टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस विभागाच्या गाफील, उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर असून रोष व्यक्त केल्या जात आहे.
नुकत्याच आवाळपूर येथे घडलेला अॅसिड हल्ला हा पोलीस विभागाची उदासीनता दर्शविणारा ठरला आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून धोका आहे, असे कळविल्यावरही त्या व्यक्तीवर पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. परिणामी अॅसिड हल्ल्यासारख्या घटना समोर येतात. (वार्ताहर)