मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दफ्तरदिरंगाई
By Admin | Updated: March 14, 2015 01:11 IST2015-03-14T01:11:09+5:302015-03-14T01:11:09+5:30
या तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी मुख्यालयी स्थायिक नसून इतर तालुक्यातून रोज ये-जा करतात. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक,...

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दफ्तरदिरंगाई
कोरपना : या तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी मुख्यालयी स्थायिक नसून इतर तालुक्यातून रोज ये-जा करतात. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असून अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटुंबे पॉश शहरात वास्तव्याला ठेऊन दुचाकी वाहनाने ३० ते ४० किलोमीटर अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. अशा दैनंदिन प्रवासी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी (जि.यवतमाळ), राजुरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यासाठी सदर कर्मचारी खरोखरच पात्र आहेत काय? याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपनाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार सध्या तालुक्यात सुरू आहे.
कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत. कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ये-जा करण्यासाठी चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)