निष्काळजीपणामुळे नागरिक नळ योजनेपासून वंचित
By Admin | Updated: September 8, 2016 00:42 IST2016-09-08T00:42:32+5:302016-09-08T00:42:32+5:30
सिंदेवाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरवाही येथे २०१० मध्ये नळ योजना मंजूर झाली.

निष्काळजीपणामुळे नागरिक नळ योजनेपासून वंचित
पाच वर्षांपासून काम बंद: पत्रकार परिषदेत ग्रामस्थांची कारवाईची मागणी
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरवाही येथे २०१० मध्ये नळ योजना मंजूर झाली. काम सुरु झाले. मात्र पाच-सहा वर्षापासून टाकीचे बांधकाम रखडले असून पाणी पुरवठा समिती याला जबाबदार असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत उमरवाहीवासीयांनी केला आहे.
नवरगाव येथे नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. २०१० मध्ये आदिवासी उपाय योजनेअंतर्गत उमरवाही उटी या गावासाठी पाण्याची टाकी व नळ योजना मंजूर झाली. त्यासाठी शासनाकडून सदर बांधकामासाठी ३३ लाख ९९ हजार २४३ रुपयांचा निधी मंजूर झाला. पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून निविदा काढून बांधकामाला सुरुवात झाली. काही काम करुन संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले. त्यानंतर पुन्हा दोन कंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. मात्र दोन वर्षात सदर काम पूर्ण करायचे असताना आज पाच ते सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी काम पूर्ण झाले नाही. उमरवाही या आदिवासीबहूल गावाला नळाच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे.
संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा समिती असून समितीचे अध्यक्ष अरुण बोरकर आणि सचिव वंदना पी. मसराम आहेत. काम अपूर्ण असल्याने त्यांची कारणे गावकऱ्यांनी वेळोवेळी विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. तसेच सदर कामावर आतापर्यंत किती खर्च करण्यात आला, याचीही माहिती मिळू शकली नाही.
वास्तविक पाहता पाणी पुरवठा समितीचा कार्यकाळ हा साधारण तीन वर्षाचा असताना मागील सहा वर्षापासून एकच अध्यक्ष आहे. अध्यक्ष हे कोणत्याही खर्चासाठी ग्रामपंचायतीची मान्यता न घेताच स्वमर्जीने खर्च करीत असून स्वत:च तो खर्च मंजूर करुन घेतात. मागील पाच- सहा वर्षापासून या समितीचे संपूर्ण रेकार्ड हे अध्यक्षांच्या घरी असून याबद्दल कोणतीही माहिती ग्रामपंचायतीला पर्यायाने गावकऱ्यांना नाही. या कामाची जमाखर्चाची माहिती २०१२ मध्ये अशोक विश्वनाथ बोरकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागितली. त्यावर ग्रामसेवकांनी याबाबत कोणतेही रोकार्ड ग्रामपंचायतीला उपलब्ध नसल्याची माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच आजतागायत संपूर्ण रेकार्ड हे अध्यक्षांच्या घरी आहे. अध्यक्ष ग्रामपंचायतीच्या मिटींगमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये येऊन माहिती द्यायला तयार नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी यावेळी केला.
अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेवटी गावकऱ्यांनी २० आॅगस्ट २०१६ पाणी पुरवठा या विषयावर विशेष ग्रामसभा घेतली. यामध्येही अध्यक्षांनी उपस्थित राहून हिशोब सादर न केल्यामुळे तसेच सदर खात्याचे व्यवहार करताना अगोदर ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक असताना कार्यक्रम रजिस्टरमध्ये जमाखर्चास ग्रामसभेची मंजुरी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केली असून समितीच्या दुर्लक्षामुळे नळ योजनेचे काम स्थगित आहे. सदर ग्रामसभेमध्ये नळ योजनेची वरिष्ठाकडून योग्य चौकशी करुन दोषी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
याबाबतच्या तक्रारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रकल्प अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हाधिकारी, आदिवासी मंत्री, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, उपअभियंता पाणी पुरवठा विभाग पं.स. सिंदेवाही, संवर्ग विकास अधिकारी पं.स. सिंदेवाही यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य भास्कर पेंदाम, सिताराम मेश्राम, रवी मसराम, दिगांबर कळाम, अशोक मसराम, उद्धव बोरकर, राजू मसराम, अशोक बोरकर, धर्मदास उईके व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)