आधुनिक यंत्रामुळे शेतमजुरांची उपासमार
By Admin | Updated: January 10, 2015 22:52 IST2015-01-10T22:52:40+5:302015-01-10T22:52:40+5:30
धान मळणी यंत्रानंतर आता कृषी क्षेत्रात धान कटाई यंत्राने प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही क्रांती असली तरी यामुळे ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत.

आधुनिक यंत्रामुळे शेतमजुरांची उपासमार
सिंदेवाही : धान मळणी यंत्रानंतर आता कृषी क्षेत्रात धान कटाई यंत्राने प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही क्रांती असली तरी यामुळे ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगामात १८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. या पिकावर ग्रामीण परिसराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. धानाच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत जवळपास चार महिन्याच्या कालावधी लागतो. या चार महिन्याच्या कालावधीत रोवणी, निंदण, कापणी आणि मळणी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. या कालावधीत प्रत्येक गावातील जवळपास ७५ टक्के मजूर व महिला मजूर धान शेतीच्या कामात व्यस्त असतात. पण गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात ट्रॅक्टरने प्रवेश केल्याने ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजुरांना फटका बसला होता.
ग्रामीण परिसरात धान कटाई मुख्यत्त्वे महिला करीत असतात. ही धान कटाई करण्यासाठी गावातील १० ते १२ महिलांचा गट तयार करतात. एका गावात असे सहा-सात महिला गट असतात. एकरी आठ कुडव भावाने ही धान कटाई होत असते. एक ते दीड महिने चालणाऱ्या हंगामात एका महिलेची चार ते पाच खंडी (आठ क्विंटल) धानाची कमाई होते. ही कमाई एका कुटुंबासह वर्षभर पुरेल एवढी असते. धान मळणी यंत्र आल्यानंतर शेतकऱ्यांनी बैलबंडीच्या धान मळणीला पूर्णपणे तिलांजली दिली आहे. त्याचप्रमाणे गंजी बांधणीची पद्धतसुद्धा धान कापणी प्रमाणेच आहे. गंजी बांधणीमध्ये १० ते १२ शेतमजूर पुरुषाचा गट असतो. दोन एकर जमिनीला एक खंडी धान किंवा १ हजार ५०० रुपये एकराप्रमाणे रोखीने गंजी बांधणी करण्याची पद्धत आहे. धान कापणी लवकर होते म्हणून ‘गुत्ता’ पद्धतीच्या धान कापणीला तिलांजली देण्याची भिती व्यक्त होत आहे.
या प्रकाराने तालुक्यातील अनेक गावांतील शेकडो मजूर दीड ते दोन महिने रोजगारापासून वंचित राहण्याची पाळी आली आसहे. याचा फटका सिंदेवाही तालुक्यातील हजारो शेतमजुरांना बसला आहे. (तालुका प्रतिनिधी)