निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भाचा विकास शक्य
By Admin | Updated: February 16, 2015 01:12 IST2015-02-16T01:12:32+5:302015-02-16T01:12:32+5:30
सिंचन क्षेत्रात विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या निम्न पैनगंगा योजना व वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ ब्राडगेज रेल्वे मार्ग विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे.

निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भाचा विकास शक्य
चंद्रपूर : सिंचन क्षेत्रात विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या निम्न पैनगंगा योजना व वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ ब्राडगेज रेल्वे मार्ग विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. दोन्ही प्रकल्पाच्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये समावेश करून विकास साधावा. यासाठी वित्त तथा अर्थमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी सामाजिक मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मोघे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पैनगंगा नदीवर निम्न पैनगंगा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प होणार आहे. १९९६ मध्ये या योजनेला सरकारने मंजुरी दिली. या योजनेसाठी दोन लाख २७ हजार २७१ हेक्टर सिंचन क्षमता वाढणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ६०७ हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे.
कोरपना, राजुरा आदी नक्षलग्र्रस्त तालुक्यातील ५८ हजार ३५५ हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे. या प्र्रकल्पाला १२ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा आदिलाबाद जिल्ह्यालाही लाभ होणार आहे. यासाठी १८ फेब्रुवारीला तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव व त्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. यात वित्तमंत्री मुनगंटीवार उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये वित्तमंत्र्यांनी या प्रकल्पावर जोर देण्याची गरज असल्याचे मोघे म्हणाले. (नगर प्रतिनिधी)
ब्राडगेज रेल्वे विदर्भासाठी उपयुक्त
वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ हा ब्राडगेज रेल्वे मार्ग यवतमाळसह वर्धा व नांदेड जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ११ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालुप्र्रसाद यादव यांनी या मार्गाचे भूमिपूजन केल्यानंतर मागील सहा वर्षांपासून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. पुढील रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधी मिळण्याची अपेक्षा मोघे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, गजानन गावंडे, राहुल पुगलिया, प्रशांत दानव, प्रविण पडवेकर तथा काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.