पिकांच्या नुकसानीमुळे ‘गजस्वारी’त आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:08 IST2017-09-13T00:08:15+5:302017-09-13T00:08:15+5:30
गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला शिवारात ठाण मांडूण असलेल्या नरभक्षक वाघिनीमुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

पिकांच्या नुकसानीमुळे ‘गजस्वारी’त आडकाठी
वेदांत मेहरकुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला शिवारात ठाण मांडूण असलेल्या नरभक्षक वाघिनीमुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. या वाघिणीच्या शोधासाठी सोमवारला गजराजला पाचारण करण्यात आले. मात्र शेतशिवारातील पिकांची प्रचंड नुकसान होणार, या भितीपोटी गजस्वारीतून वाघिणीचा शोध या मोहिमेस आडकाठी निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घालून गावकरी व पाळीव जनावरांना ठार करणाºया नरभक्षक वाघिणीला तेथील वनविभागाने जेरबंद करून चपराळा अभयारण्यात सोडले होते. तेथून ती वाघिण वैनगंगा नदी ओलांडत गोंडपिपरी तालुका हद्दीत शिरकाव करून गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला या शिवारात भ्रमण करित आहे. याबाबत ‘रेडिओ कॉलर’ तंत्रज्ञानामुळे वनविभागाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाने सर्च मोहिम चालवून ‘त्या’ नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला. मात्र शेतशिवारातील झुडपे व पराठी पिके यांची उंची अधिक असल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
अखेर वनविभागामार्फत बोर अभयारण्यातून हत्तीणीला पाचारण करून वाघिणीची शोध मोहीम करण्याचे ठरवून सोमवारी गजराजाला वनविभाग विक्री आगारात आणण्यात आले. मात्र वाघिणीचे ठाण असलेल्या रेडिओ कॉलर यंत्राच्या माहितीच्या साहाय्याने मिळालेल्या लोकेशनपर्यंत पोहचण्यासाठी ‘गजस्वारी’ करताना शेतपिकांची प्रचंड प्रमाणात नासधूस होणार असून होणाºया संभाव्य नुकसानीची भरपाईबाबत अद्यापही वनविभागाच्या कर्मचाºयांना खात्री न झाल्याने व शेतकºयांचा पुढील काळात निर्माण होणारा संभाव्य संताप, याचा विचार करून सर्च मोहिमेतील कर्मचाºयांनी ‘गज स्वारीतून’ वाघिणीची सर्च मोहीम तूर्तास टाळली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्या वाघिणीने रानडुकराची शिकार केल्याची माहिती आहे.