लक्कडकोट येथे उपचाराअभावी ४० ते ५० बकऱ्या दगावल्या
By Admin | Updated: August 26, 2016 00:53 IST2016-08-26T00:53:47+5:302016-08-26T00:53:47+5:30
महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव

लक्कडकोट येथे उपचाराअभावी ४० ते ५० बकऱ्या दगावल्या
शेतकऱ्यांचे नुकसान : डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीत
सास्ती : महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे व त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने ४० ते ५० बकऱ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील लक्कडकोट परिसरात जंगली भाग असल्यामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुधन पाळतात. त्यात शेळ्या मेंढ्यांसह इतर जनावरांचा समावेश आहे. शासनही विविध योजना राबविते. परंतु या योजनांची योग्य अमलबजावणी होत नसल्यामुळे या योजना निरर्थक ठरत असल्याचे या परिसरात दिसून येत आहे.
मागील महिन्याभरात अनेक दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे परिसरातील बकऱ्यांवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेकडो बकऱ्या आजारी पडल्या. परंतु या आजारी पडलेल्या बकऱ्यांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यातील ४०-५० बकऱ्या उपचाराअभावी दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लक्कडकोट येथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. परंतु येथील पशुधन पर्यवेक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. येथील मलय्या नानवेनवार यांच्या १५, सतय्या नानवेनवार यांच्या ७, लक्ष्मण झाडे यांच्या ६, संजय दुर्गे यांच्या तीन, प्रशांत झाडे यांच्या तीन, यासह इतर शेतकऱ्यांच्या अशा एकूण ४० ते ५० बकऱ्या दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
लक्कडकोट येथे जनावरांचा दवाखाना आहे. परंतु या ठिकाणी डॉक्टर रहात नसल्यामुळे व औषधी व इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे आमची जनावरे मरत आहे.
-लक्ष्मण झाडे, शेतकरी, लक्कडकोट
तहसीलदारांनी घेतली दखल
परिसरातील गावभेटी करीता राजुरा येथील तहसीलदार लक्कडकोट परिसरात गेले असता, त्याच्या समोर ही घटना उघड झाली. शेतकऱ्यांनी उपचाराअभावी बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगताच तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र लिहून लक्कडकोट येथील बकऱ्यांच्या साथरोगावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू पाठवून तपासणी करण्याची व मुख्यालयी न राहणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.