डॉक्टरांंच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुलाचा मुत्यू
By Admin | Updated: May 6, 2016 00:57 IST2016-05-06T00:57:09+5:302016-05-06T00:57:09+5:30
जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला.

डॉक्टरांंच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुलाचा मुत्यू
रुग्णालयाची तोडफोड : जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव
जिवती : जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी करीत मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी नकार दर्शविला. यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नोकेवाडा येथील विष्णू खांडेकर यांचा मुलगा शिवम विष्णू खांडेकर (११) याला दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने गावातील आरोग्य सेविका यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. तिथे तपासणीसाठी त्याचे रक्त घेऊन औषधी देण्यात आली. परंतु ताप कमी होत नसल्याने मुलाच्या आईने शिवमला जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी रक्त तपासणी केली व तात्पुरता उपचार करुन घरी जाण्यास सांगितले. औषधी घेतल्यावर शिवमला काही वेळ बरे वाटू लागले. मात्र रात्र झाल्यावर पुन्हा तब्बेत बिघडली. पुन्हा तातडीने शिवमला जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र यावेळी डॉक्टरांनी वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना काही तास जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रातच थांबावे लागले. काही तासानंतर इंजेक्शन देऊन त्याला पुढील उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही तात्पुरता उपचार करुन चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत शिवमची प्रकृती हाताबाहेर गेली होती. बराच वेळ झाल्याने अखेर शिवमचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शिवमचा जीव गेला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी के.जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य औषधोपचार केला. त्यानंतर त्याला गडचांदूरला हलविल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
माझ्या मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. के. जी. कोरडे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करा, अन्यथा मुलाचे प्रेत दवाखान्यासमोरुन हटवणार नाही, अशी भूमिका मुलाचे वडील विष्णू खांडेकर व त्याच्या नातेवाईकांनी घेतली. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घघटनास्थळी पोहचून नातेवाईकांची सांत्वना केली. संबंधित डॉक्टरावर चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले व जिवती पोलिसांना संबंधित डॉक्टराच्या विरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर शिवमचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.