वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात
By Admin | Updated: July 3, 2017 01:01 IST2017-07-03T01:01:22+5:302017-07-03T01:01:22+5:30
तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास

वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात
राजुरा तालुका : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तुघलकी कारभारामुळे राजुरा तालुक्यात प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे राजुरा आणि कोरपना तालुक्यामधील केवळ सहा उद्योगांची नोंद आहे. कारखान्यातून होणारे प्रदूषण कमी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे योग्य नियमावली नाही. कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार होवून आयुष्यमान कमी होत आहे. लहान मुलांना विविध आजाराची लागण होत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत आहे. यामुळे कंपन्याचे प्रदूषण वाढतच आहे.
वेकोलिच्या खाणींमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे. कोळशाच्या धुरामुळे सल्फर डॉयआॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईट, कार्बन डॉयआॅक्साईड, मोनो आॅक्साईड यांच्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये ५० टक्के रुग्ण श्वसनाचे आढळले आहे. धुरामुळे खोकला, दमा असे आजार होत असून प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. कोळसा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून निरी आणि आयआयटी यांच्या सर्वेमध्ये प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.