तालुक्यात २०३ शेततळे : यंदाच्या खरिपात सिंचनासाठी लाभ होणार राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल: भारत देश कृषी प्रधान देश असल्याने जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात वास्तव्य करतात. त्याचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक आहे. हे हेरुन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात आली. त्यात मूल तालुक्यात शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत २०३ शेततळे तयार केले आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या शेततळ्यामुळे शेती समृद्ध झाल्याचे दिसून येते. शासनाच्या शेतीविषयक योजनांचा फायदा घेतला तर शेती विकासाला चालना मिळते, हे स्पष्ट दिसून येते. दिवसेंदिवस पाण्याचा लहरीपणा शेती उत्पादनाला घातक ठरु पाहत असताना मात्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून विविध सिंचनाच्या योजना अंमलात आणत आहे. याचाच एक भाग म्हणून मागील फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना आणण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार याचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्याला वेगळे महत्व आहे. तालुक्यातील शेतकरी सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हावा, हीदेखील त्यांची मनिषा असल्याने येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांनी नियोजनबद्ध आखणी करुन आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी घेत मागेल त्याला शेततळे ही योजना यशस्वी करण्याचा ध्यास घेतला. २८३ आलेल्या इच्छुक लाभार्थीपैकी अर्जाची छाननी करुन तालुकास्तरीय समितीने २०३ लाभार्थीना शेततळे तयार करण्यासाठी मंजुरी प्रदान केली. यावेळी विविध शासकीय कार्यालयाची कामे असल्याने पोकलँड किंवा जेसीबी हे यंत्र उपलब्ध होणे शेतकऱ्यांना कठीण झाले होते. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करुन १२५ शेततळे लाभाथीर् शेतकऱ्यांनी यंत्राविना खोदकाम करुन पूर्ण केले व उर्वरित शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे शेततळ्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे मागील वर्षात २०३ शेततळे झाल्याने सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकली. खंडीत पावसाच्या वेळेस लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळ्यातील पाण्यापासून आपले धान्य पीक सुरक्षित करण्यास मदत झाली. त्यापासून ४० हेक्टर संरक्षित क्षेत्रात पाणीसाठा पुरविण्यात आला. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे दोनदा शेततळ्यामधील पाणीसाठा उपलब्ध होऊन शेतीसाठी मदत झाली. तसेच सदर पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील हरभरा, गहू, सांबार, वाल, पोपट व इतर कडधान्य व भाजीपाल्याच्या पिक उत्पादनात झाला आहे. शेततळ्यातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी बांधावर कमी उंचीचे झाडे लावली असल्याने पर्यावरणाचा समतोलदेखील कायम राखला जात आहे.
शेततळ्यांमुळे शेती झाली समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 01:22 IST