दुष्काळामुळे रोहयो मजुरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती

By Admin | Updated: May 12, 2015 00:58 IST2015-05-12T00:58:55+5:302015-05-12T00:58:55+5:30

चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली

Due to drought, there is a 'Record Break' presence of Rohuya laborers | दुष्काळामुळे रोहयो मजुरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती

दुष्काळामुळे रोहयो मजुरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती

५० हजारांचा आकडा पार : जिल्हाभरात कामांना सुरूवात
चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली आहे. आतापर्यंत रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात झालेल्या कामांवर ४० हजारच्या आसपास मजुरांची संख्या असायची. मात्र यावर्षी हा आकडा पार झाला असून गत आठवड्यात तब्बल ५० हजार ४८४ मजुरांची रोहयो कामांवर उपस्थिती होती.
गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. तर उशीरा आलेल्या पावसामुळे दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. याचा फटका सहन करून शेतकऱ्यांनी कसेतरी पिकांची लागवड केली. मात्र पावसाने पून्हा दगा दिला. त्यामुळे हाती आलेले पीक करपून गेले. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीवर मात करण्यासाठी व हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना काम देण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामांना लवकर सुरूवात केली. ग्रामीण भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीणांत नैराश्य होते. मात्र रोहयो कामांमुळे आर्थिक टंचाईच्या खाईत सापडलेले शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या कामांवर जाण्यास पसंती दिली. त्यामुळे मजुरांची उपस्थिती रेकॉर्ड ब्रेक झाली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कामे केली जात असून शंभर दिवसाचे काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे गावस्तरावर विहिर बांधकाम, तलाव खोलीकरण, रस्ता काम, रोपवन अशाप्रकारची कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहेत. ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत ही कामे केली जात आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक कामे
चंद्रपूर जिल्ह्यात सध्यास्थितीत रोजगार हमी योजनेर्तंगत ११६९ कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक १००१ कामे ग्राम पंचायत स्तरावर सुरू असून यंत्रणेमार्फत १६८ कामे सुरू आहेत. ग्राम पंंचायत स्तरावरील कामांवर ४८ हजार ६८१ तर यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर १८०३ मजुरांची उपस्थिती आहे.

शेल्फवरील कामांमुळे रोजगाराचा प्रश्न मिटला
जिल्ह्यात सध्यास्थितीत ११६९ कामे सुरू असली तरी शेल्फवर ११ हजार ६१७ कामे ठेवण्यात आली आहेत. मजुरांकडून रोजगाराची मागणी झाल्यास ही कामे केव्हाही सुरू करता येणार आहेत. या कामांची ७४.३६ लाख मजुर क्षमता आहे. त्यामुळे सध्यास्थितीत कोणत्याही ग्रामीण नागरिकाला मजुरीसाठी भटकंती करण्याची गरज नाही.

मजुरीप्रती असंतोष
ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची लक्षणीय वाढ असली तरी मजुरीप्रति असंतोष दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोहयो मजुरीत केवळ १३ रूपयांची वाढ शासनाने केली आहे. खासगी कामांवर यापेक्षा दुप्पट मजुरी मिळत असल्याने जोखीम पत्करून करावे लागणाऱ्या रोहयो कामाची मजुरी वाढविण्याची मागणी आहे.

रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत. मजुराला काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून कोणताही मजुर कामासाठी भटकंती करू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत कामे सुरू आहेत. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीमुळे रोहयो कामांवर मजुरांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे.
- विनोद हरकांडे
उपजिल्हाधिकारी रोहयो, चंद्रपूर.

Web Title: Due to drought, there is a 'Record Break' presence of Rohuya laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.