प्रलंबित वेतनाअभावी शिक्षकांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: April 18, 2015 01:13 IST2015-04-18T01:13:26+5:302015-04-18T01:13:26+5:30
तालुक्यातील चकतळोधी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सूर्यभान धोंडूजी कोडापे यांची सन २००४ मध्ये राजुरा पं.स.मधून गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये बदली झाली.

प्रलंबित वेतनाअभावी शिक्षकांवर उपासमारीची पाळी
गोंडपिपरी: तालुक्यातील चकतळोधी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सूर्यभान धोंडूजी कोडापे यांची सन २००४ मध्ये राजुरा पं.स.मधून गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये बदली झाली. मात्र मागील १० वर्षांपासून त्यांच्या वेतनाबाबतच्या आर्थिक समस्या अजूनही प्रलंबित असल्याने शिक्षक कोडापे यांच्यावर अन्याय झाला असून केवळ पोकळ आश्वासने देवून अधिकारी व कारकुनांनी वेळ मारुन नेण्यापलीकडे काहीच न केल्याचा आरोप त्यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
तालुक्यात चेकतळोधी येथे कार्यरत सूर्यभान कोडापे नामक शिक्षक अधिकाऱ्यांचे दुर्लक्षीत धोरण तर पंचायत समितीमधील कारकुनांच्या तुघलकी कारभारामुळे त्यांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. सूर्यभान कोडापे हे सन २००४ साली राजुरा पंचायत समितीमधून गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये रुजू झाले. मात्र येथील अधिकारी व शिक्षण विभागातील कारकूनाने कोडापे यांचे पाचव्या वेतन आयोगाचे १५ टक्के अरियर्स, जि.प. स्तरावरुन मंजूर होवून आलेल्या ७३ दिवसांच्या आजारी रजांचे वेतन, सन २००३ ची वार्षिक वेतनवाढ, सेवा पुस्तिकेला नोंद, सन २००४ च्या २२ दिवसांच्या आजारी रजेचा पगार, घरभाडे भत्त्याचे अरियर्स, अतिरिक्त घरभाड्याचे अरियर्स, सहाव्या वेतन आरोगाचे वेतन निश्चितीकरण, जि.पी.एफ हप्ते थकीत, या समस्या अजूनही प्रलंबित असल्याने कोडापे यांची थकीत बिले काढण्यासाठी पं.स. स्तरावरील अधिकाऱ्यांनी दाखविलेली अकार्यक्षमता यामुळे कोडापे यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सूर्यभान कोडापे यांचे मागील बऱ्याच वर्षापासून थकीत पगार व इतर देयके एकाचवेळी काढल्यास त्यांचेवर आयकर विभागाचा बोझा पडणार असल्याने याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात चौकशी करून न्याय द्यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)