सुंदर गाव स्पर्धेतील पुरस्कार विजेत्या गावांचे कोरडे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST2021-08-19T04:31:49+5:302021-08-19T04:31:49+5:30
वरोरा(चंद्रपूर) : प्रत्येक तालुक्यातून आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत एका गावाची निवड करण्यात आली. सरपंचांना प्रमाणपत्र देऊन जिल्हास्तरावर ...

सुंदर गाव स्पर्धेतील पुरस्कार विजेत्या गावांचे कोरडे कौतुक
वरोरा(चंद्रपूर) : प्रत्येक तालुक्यातून आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत एका गावाची निवड करण्यात आली. सरपंचांना प्रमाणपत्र देऊन जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात आले. परंतु मागील पाच महिन्यांपासून पुरस्काराचा निधी मिळाला नाही. त्यामुळे विजेता गावाचे शासनाने तूर्तास कोरडे कौतुक केल्याचे मानले जात आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यामार्फत स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येते. महाविकास आघाडी सरकारने त्याचे नाव आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजना असे ठेवले. स्वच्छता व इतर निकषाच्या आधारावर या योजनेत जिल्ह्यात एक व प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड केली जाते. जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख तर तालुक्यातून प्रथम येणाऱ्या गावास १० लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. सरपंचांना प्रमाणपत्र दिले, परंतु मागील पाच महिन्यांपासून पुरस्काराची रक्कम मात्र मिळालीच नाही.
कोट
ग्रामपंचायतीची कर वसुली टाळेबंदी काळामध्ये कमी झाली. त्यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक अडचणी आल्या. या पुरस्काराची रक्कम प्राप्त झाली असती तर विकास कामाचे नियोजन करून करता आले असते.
- राजेंद्र चिकटे, सरपंच, चारगाव खुर्द, पुरस्कार विजेते गाव