मद्यपी शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण
By Admin | Updated: August 14, 2016 00:25 IST2016-08-14T00:25:11+5:302016-08-14T00:25:11+5:30
ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथून जवळच असलेल्या तुलानमाल (मेंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ...

मद्यपी शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण
तुलानमाल येथील घटना : पालकांची पोलिसांत तक्रार
मेंडकी : ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथून जवळच असलेल्या तुलानमाल (मेंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक नरेंद्र शंकर भोले यांनी आपल्या शाळेतील चार विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडलीे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिक्षक नरेंद्र भोले यांनी इयत्ता तिसरीतील नेहा श्रीधर हणवते, मंदीप मधुकर जगतापे, राकेश अनिल आंबोने आणि इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी विनोद आत्याम यांना वर्गात बेदम मारहाण केली असून विद्यार्थ्यांच्या पायावर तसेच हातावर मारण्याचे व्रण उमटले आहेत. विद्यार्थ्यांचे वडील, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी व काही प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांसह मेंडकी येथील उपपोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना गिरवणारा शिक्षक दारू पिऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देत असेल तर विद्यार्थ्यांनी या शिक्षकाकडून काय शिक्षण घ्यावे, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. सहायक शिक्षक नरेंद्र भोले यांनी यापूर्वी असेच कारनामे केले होते. त्याची तक्रार शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश जगतापे, उपाध्यक्ष प्रमोद अलोने व समितीच्या सदस्यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली. परंतु या अधिकाऱ्यानी चौकशी केली नाही.
सदर मद्यपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी केली आहे. या शिक्षकाची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन करून शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसमवेत काही प्रतिष्ठित नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)
शिक्षकाने काढला पळ
शाळेत घडलेला प्रकार सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सायंकाळी आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आई-वडील तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश शंकर जगजापे, उपाध्यक्ष प्रमोद नामदेव अलोने व इतर सदस्यांनी शनिवारी सकाळी ८ वाजता शाळेवर हल्लाबोल केला. घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता शिक्षक नरेंद्र भोले यांनी घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून शाळेतून पळ काढला.
संबंधित घटनेची लेखी तक्रार अद्याप गट शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेली नाही. या शाळेच्या मुख्याध्यापकाने फोनवर माहिती दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात येईल.
- दामोधर सेलोकर,
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, ब्रह्मपुरी.