दारु पिऊन शिक्षकाचा धिंगाणा
By Admin | Updated: October 24, 2016 00:54 IST2016-10-24T00:54:13+5:302016-10-24T00:54:13+5:30
येथील पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्हाळगाव शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मोढे या शिक्षकाचे अनेक कारनामे चर्चेत आहेत.

दारु पिऊन शिक्षकाचा धिंगाणा
कोरपना : येथील पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्हाळगाव शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मोढे या शिक्षकाचे अनेक कारनामे चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी पंचायत समितीकडे असताना त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. अशातच दारू पिऊन शाळेतच धिंगाना घातल्याचा प्रकार त्यांच्याकडून घडला आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक गावे दारु बंदी करुन दारु मुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. मात्र कन्हाळगाव जि.प. शाळेत शिक्षक मोढे कर्तव्यावर असताना वर्गात दारूची बॉटल व पाण्याची बॉटल घेऊन टेबलावरच मद्य प्राशन केल्याचे निर्दशनास आले. हा प्रकार तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून चित्रफीत वायरल झाल्यामुळे गावागावात चर्चेला उत आला आहे. अशा शिक्षकाकडून आदर्शाचे धडे कसे घ्यावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
या प्रकारामुळे पालकामध्ये रोष पसरला असून सरपंच विनोद नवले, आबीद अली, रमेश मालेकर, वासुदेव आवारी यांनी संवर्ग विकास अधिकारी कोरपना यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचे कथन केले व सदर शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा कन्हाळगावच्या गावकऱ्यांनी दिला. संबंधित तक्रार व चित्रफीत मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंग यांना पाठवण्यात आल्याची माहिती कन्हाळगावचे विनोद नवले यांनी सांगितले.
याबाबत जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे कन्हाळगाव वासीयांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)