मदत देण्याची मागणी : शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगरउपरी : सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाच्या नहरातून सिंचन होणाऱ्या कोंडेखल (घोडेवाही चक) या गाव परिसरातील धान पिक पाण्याअभावी उद्ध्वस्थ झाले आहे. मागील तीन वर्षांपासून नहराचा उपसा झाला नाही. ठिकठिकाणी नहराची दयनिय अवस्था झाली आहे. या वर्षात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी संकटात आहेत. शासनाने प्रत्यक्ष गावाचा सर्व्हे करून येथील शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोंडेखल, घोडेवाही ही गावे असोलामेंढा तलावाअंतर्गत नहराच्या सिंचनाखाली येतात. या गावांना भटेजोब या सबमायनरने शेतीला पाणी पुरविले जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून या नहराचा उपसा झाला नसल्याने व ठिकठिकाणी नहराची दयनिय अवस्था झाली असल्याने असोलामेंढा तलावाचे पाणी येथील शेतीला मिळेनासे झाले आहे. त्यातच यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सिंचनाअभावी या गावातील ४० टक्के शेतकऱ्यांनी धानाची पेरणी व रोवणीची कामे केली. मात्र शेतीला पाणी मिळाले नसल्याने धान पिक पुर्णत: करपले. यामुळे येथील हजारो हेक्टरमधील भात पिक बुडाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासन दरबारी आपल्या विवंचना घेवून मदतीची मागणी केली. मात्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला असला तरी यातून सावली तालुका वंचित ठेवला आहे. यादीत सावली तालुका समाविष्ट करून कोंडेखल (घोडेवाही चक) या गाव परिसरातील धान पिकाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष गावाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी गोपाल रायपुरे, किशोर उंदीरवाडे, विनायक पा. थुनेकर, मोरेश्वर गोहणे, मनोहर नन्नावरे, सुनिल भैसारे, पदमाकर पेंदोर, नितीन सोते, हेमचंद लाडे आदींच्या शिष्टमंडळाने सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)
कोंडेखल गावात तीन वर्षांपासून दुष्काळ
By admin | Updated: November 29, 2015 02:00 IST