सिंदेवाही तालुक्यात कोरडा दुष्काळ
By Admin | Updated: July 8, 2014 23:24 IST2014-07-08T23:24:12+5:302014-07-08T23:24:12+5:30
सिंदेवाही तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सतत ओला आणि कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र धानपीक लागवडी खाली आहे.

सिंदेवाही तालुक्यात कोरडा दुष्काळ
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सतत ओला आणि कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र धानपीक लागवडी खाली आहे. तसेच एक हजार ४०० हेक्टरवर तूर, ८० हेक्टरवर हळद, ७५ हेक्टरवर भाजीपाला, ८० हेक्टरवर सोयाबिन, २५० हेक्टरवर तिळाचे पीक लागवडीखाली आहे. यावर्षी एक हजार २०० मि.मी.सरासरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. आर्द्रा नक्षत्र लागून १५ दिवस झाले. मात्र या नक्षत्रातसुद्धा पाऊस पडला नाही.त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सिंदेवाही तालुक्यात भाताचे प्रमुख पीक आहे.
यावर्षी सर्व बि-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधी यांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी मात्र नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता वरुणराजाच्या अवकृपेने धान पिकाचे नियोजन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. निसर्गाच्या भरवशावर या तालुक्यातील धान पिके अवलंबून आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील तलाव बोड्या, नदी-नाले कोरड्या अवस्थेत आहेत. धान पिकासाठी एक हजार २०० मि.मी.पापावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत ४ जुलैपर्यंत केवळ ८० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी ६०० मि.मी पाऊस पडला होता. तालुक्यात १०० टक्के धान पेरण्या आटोपल्या आहेत. काही परिसरात पेरणी केलेले धान बियाणांना अंकुर फुटले आहे.
परंतु पावसाअभावी अंकुर करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. नदी- नाले कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा व पाणी नाही. तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला नाही. सध्या तरी तालुक्यातील शेतकरी संकटात असून पावसाची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)