खामोना-अहेरी मार्गावर वाहनचालकांना करावा लागतो त्रासदायक प्रवास
By Admin | Updated: August 14, 2016 00:40 IST2016-08-14T00:40:04+5:302016-08-14T00:40:04+5:30
रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला,...

खामोना-अहेरी मार्गावर वाहनचालकांना करावा लागतो त्रासदायक प्रवास
रस्त्यावर खड्डेच खड्डे : सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देईना
गोवरी : रस्ते हे विकासाचे प्रतिक आहे. रस्त्यावरून त्या-त्या भागाचा कसा विकास झाला, याचा अंदाज बांधता येतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चांगले असणे आवश्यक असते. मात्र खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नरकयातनांचा प्रवास करावा लागत आहे. परंतु सुस्तावलेला बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.
राजुरा तालुक्यातील खामोना-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुगी करणे आवश्यक असते. परंतु बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्डा किती खोल आहे, याचा नेमका अंदाज वाहनधारकांना येत नसतो. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडले आहेत. शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी अहेरी, खामोना येथे जात असल्याने चांगल्या रस्त्याअभावी त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावरून त्या त्या परिसरातील विकासाची दिशा ठरत असते. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांना आज मोठ्या प्रमाणात अवकळा आल्याने रस्त्यांचा विकास गेला कुठे, हा प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही. खामोना-अहेरी मार्गाची गेल्या अनेक दिवसापासून दुरवस्था झाल्याने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र सुस्तावलेल्या बांधकाम विभागाला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी खामोना येथील पोलीस पाटील विजय पादे, उपसरपंच रेखा पिंपळशेंडे, बंडू जेऊरकर, लघुत्तम सातपुते, आकाश कातकर, घनश्याम उरकुडे, दौलत लोणारे, राजू कामटे, सूरज पादे, श्याम कातकर, कवडू सातपुते, प्रकाश मोरे, विलास सातपुते, चेतन लोणारे, राजेंद्र पिंपळकर व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
रस्त्यात खड्डा का खडड्यात रस्ता कळेना
राजुरा तालुक्यातील खामोना - अहेरी मार्गाची एवढी बिकट अवस्था झाली आहे की, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता आहे, हे क्षणभर चुकल्यासारखे वाटते. रस्त्यावरील खड्डे वाहनधारकाच्या जीवावर उठले आहे. या रस्त्याचे पूर्णत: बारा वाजल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष का देत नाही, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून अनुउत्तरीतच आहे.