लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चहाच्या टपरीवर पेपर अथवा प्लास्टिकच्या कपमधून चहा दिला जातो. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे अशा कपमध्ये चहा पिणे टाळावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप वरघने यांनी दिला आहे.
राज्यातील सिंगल यूज प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे. नवीन नियमानुसार १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांनादेखील वापरास बंदी आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ अनुसार सिंगल यूज (एकल वापर) प्लास्टिकच्या काही वस्तूंना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. भाजी, फळ आणि किराणा मालाचे विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यामध्ये साहित्य दिले जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चाय हा सर्वांच्या आवडीचे पेय. थकवा दूर करण्याच्या अनुषंगाने अनेकजण वेळी-अवेळी टपरीवर हॉटेलात चाप पितात. मात्र चायटपरी, हॉटेलमध्ये कागदी व प्लास्टिकच्या कपचा वापर केला जात असल्याचे बरेच ठिकाणी बघायला मिळते. मात्र अशा कपचा वापर करणे धोकादायक आहे.
दंडाची रक्कम मोठी, तरीही दुर्लक्ष...बंदी असलेल्या प्लास्टिकचा पहिल्यांदा वापर करताना आढळल्यास दुकानदाराकडून पाच हजार रुपये इतका दंड आकारला जात आहे. दुसऱ्यांदा २० हजार तर तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. दंड करूनही प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरात महापालिकेची कारवाई थंडावली...महापालिकेची प्लास्टिक पिशव्यांबाबतची कारवाई सध्या थंडावली आहे. ही कारवाई करण्यासाठी ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र पथके तैनात केली आहे. प्रत्येक पथकामध्ये १ सहायक आरोग्याधिकारी, १ मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदी पथकांचा समावेश आहे.
४ पथकेप्लास्टिक पिशव्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मनपाने चार पथके गठित केले आहे. ते कारवाईसाठी गस्त घालतात.
बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदीमागील काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक कप हे आरोग्यास धोकादायक असल्याचे संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक कपवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिक व कागदी कप बंदीचे काढलेले पत्र हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
"कागदापासून बनवलेले कप सुरक्षित ठेवण्यासाठी कार्बडिझम कीटकनाशक-बुरशीनाशक वापरले जाते. गरम चहा, कॉफी आदी कपमध्ये टाकल्यावर त्यात रसायने विरघळून पेयांसह शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो."- डॉ. प्रदीप वरघने, जनरल फिजिशियन