घर बांधकामाचे स्वप्न महागले

By Admin | Updated: April 2, 2016 00:43 IST2016-04-02T00:43:40+5:302016-04-02T00:43:40+5:30

यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरात फारशी वाढ होणार नाही, असे आश्वासन शासनाने दिले होते.

The dream of the house construction became expensive | घर बांधकामाचे स्वप्न महागले

घर बांधकामाचे स्वप्न महागले

रेडीरेकनरच्या दरात सात टक्के वाढ : महात्मा गांधी मार्गावरील क्षेत्र सर्वाधिक महागडे
मंगेश भांडेकरचंद्रपूर
यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरात फारशी वाढ होणार नाही, असे आश्वासन शासनाने दिले होते. १ एप्रिलला रेडीरेकनरचे दर जाहीर झाले असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी ६.६४ एवढी सरासरी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ साधारण असली तरी राज्यातील मोठ्या महानगर पालिकांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे आता चंद्रपुरात घर बांधण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून महात्मा गांधी मार्गावर घर बांधण्याचे स्वप्न जास्त महागडे ठरणार आहे.
राज्य शासनाकडून यापुर्वी नव्या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे १ जानेवारीला रेडीरेकनरचे दर घोषीत व्हायचे. मात्र यावर्षी जुन्या दरांंना तीन महिन्याची मुदतवाढ देऊन १ एप्रिल म्हणजे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला दर घोषीत केले. यापुढे दरवर्षी नव्या आर्थिक वर्षालाच रेडीरेकनरचे दर जाहीर होणार आहेत.
१ एप्रिलला जाहीर केलेल्या रेडीरेकनरच्या दरात चंद्रपूर जिल्ह्यासाठी सरासरी ७ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे या सर्वसाधारण दरवाढीचा अडथळा दूर करूनच घर, प्लॉट, जमीन खरेदी करावी लागणार आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार चंद्रपूर शहरात सर्वाधिक महागाई असलेला भाग महात्मा गांधी मार्ग असून सर्वात स्वस्त भाग कॉलरी क्षेत्र आहे.
नवीन दरवाढ लागू झाली असून घर, जमीन, दुकान खरेदी मुद्रांकाचा खर्च खरेदीदारांनाच करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना याचा फटका बसणार आहे.
खुली जमीन, निवासी इमारत, वरचा मजला, तळ मजला, व्यावसायिक दुकान चाळीचे दर वाढले असल्याने ग्राहकांचीच चांगलीच कसरत होणार आहे. नव्या दरानुसार जिल्हा निबंधक कार्यालयात दर आकारले जात आहेत.
यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती राज्यात व जिल्ह्यात आहे. त्यामुळे यावर्षी दर वाढणार नाही अशी आशा होती व तसे शासनानेही आश्वासन दिले होते. मात्र सरासरी ७ टक्के दरवाढ केल्याने अनेकांचे गणित बिघडणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ही दरवाढ सरासरी ७ टक्के असली तर नागपूर, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात ३ टक्के, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ४ टक्के व पुणे महानगरपालिका क्षेत्रात ६ टक्के वाढ करण्यात आली आहे. अनेकांनी घर बांधकाम व जागा घेण्याचे नियोजन केले. मात्र, राज्य शासनाने रेडीरेकनरचे दर वाढविल्याने स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

प्रॉपर्टी डिलर्सची चांदी
प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून रातोरात लखपती होण्याची किमया अनेकांनी साधली आहे. प्लॉट, घर खरेदी-विक्री करताना अनामत रक्कम देवून नोंदणीकृत खरेदीखत केले जाते. या खरेदीच्या आधारे आणखी तीन व्यवहार ग्राह्य मानले जातात. ही बाब लक्षात घेता, हे व्यावसायिक एखाद्याच्या मालमत्तेचे खरेदीखत करून त्या मुदतीत गरजू ग्राहक शोधतात. खरेदी केलेल्या दरापेक्षा एक ते दीडपट अधिक नफा कमावून सदर मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते. खरेदी-विक्रीत कोणतीही गुंतवणूक न करता विकणारा व विकत घेणाऱ्या व्यक्तीशी समन्वय साधून कमीशन तसेच दरातील तफावतीची रक्कम लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीतून कोणाला नफा होवो अथवा न होवो प्लॉट व्यावसायिकांची चांदी होते. या व्यवसायातील नफा लक्षात घेता अनेकांनी हा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरु केला आहे.

दर घोषित होण्यापूर्वी सर्वाधिक व्यवहार
बँका गृहकर्ज करताना स्टॅम ड्युटीसाठी सरकारी दर आधार मानतात. त्यामुळे रेडीरेकनरच्या दराचा परिणाम बाजारपेठेवरही होतो. दरवर्षी या दरात २० ते २२ टक्यांनी वाढ केली जाते. मात्र यावर्षी जुन्या दरांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. नव्या आर्थिक वर्षात दर वाढणार आहे, अशी ज्यांना कल्पना होती त्यांनी त्यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यातच व्यवहार उरकून घेतले आहे. त्यामुळे वर्षभराच्या तुलनेत मार्च महिन्यात जिल्हाभरात सर्वाधिक व्यवहार झाल्याची माहिती सह जिल्हा निबंधक कार्यालयाने दिली आहे.

शासनाने घोषित केलेल्या नव्या दरानुसार १ एप्रिलपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. व्यावसायिक क्षेत्र असलेल्या भागासाठी बाजार मुल्य जास्त असून दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात १५ ते २० टक्के वाढ केली जात होती. मात्र यावर्षीचे दर त्या मानाने कमी आहेत.
- अनुप हांडे, सह जिल्हा निबंधक, वर्ग-१ (निम्न श्रेणी) चंद्रपूर.

Web Title: The dream of the house construction became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.