धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाची जय्यत तयारी
By Admin | Updated: October 14, 2015 01:22 IST2015-10-14T01:22:47+5:302015-10-14T01:22:47+5:30
येथील दीक्षाभूमीवर ५९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाची जय्यत तयारी
मिरवणूक आराखडा : १५ व १६ आॅक्टोबरला दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर ५९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमीत्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीतर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभातील १५ व १६ आॅक्टोबरच्या वाहन व अस्थिधातुरथ मिरवणुकीची रुपरेषा ठरविलेली आहे. त्यानुसार सहकार्य करून मिरवणुकीत शुभ्रवस्त्र धारण करुन शांतीमयरित्या सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१५ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर शहराच्या मध्यभागी स्थित प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन विश्वशांती बंधुत्वप्रेरीत वाहनासह मिरवणुकीला आरंभ होईल. मिरवणुकीच्या अग्रभागी सदिच्छा फलक ठेवून वाहनचालक, आयोजकांची वाहने त्या मागे दोन दोनच्या रांगेत समाजबांधव राहतील, बौद्ध व आंबेडकरी अनुयायी, मधोमध लाऊडस्पिकर धारक आॅटो राहणार असून ही मिरवणुक जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका ते दीक्षाभूमी अशी मार्गक्रमण करेल.
१६ आॅक्टोबरला प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण तथागत भगवान बुद्धाचा पवित्र अस्थिधांतुचा कलश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासह सर्व पूज्यनिय भंत असतील, अस्थिकलश रथाच्या पुढे आयोजकांनी ठरविलेल्या नियोजनानुसार समता सैनिक दलाचे शौर्यशिल सैनिक असतील, त्यानंतर अस्थिकलश रथ असेल आणि त्यामागे आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य असतील. त्यानंतर बौद्ध उपासक व उपासिका व त्यानंतर उर्वरित समता सैनिक दल असतील, मिरवणुकीच्या दोन्ही बाजूला भारतीय बौद्ध महासभेने नियोजित केलेले कार्यकर्ते तसेच डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांची मानवी साखळी असेल. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघून आझाद बगीच्या येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी थांबेल, त्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही मिरवणूक जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते दीक्षाभूमी अशी मार्गक्रमण करेल. समता सैनिक दलाचे सर्व सैनिक दीक्षाभूमीवर एकदाच व एकत्रित सलामी देतील, असे कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)