मनगाव ग्रामपंचायतीचे नाली बांधकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:41+5:302021-07-21T04:19:41+5:30
कुचना : भद्रावती तालुक्यातील मनगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासक असताना नाली बांधकाम करण्यात आले असून ते अतिशय निकृष्ट असून अपूर्ण आहे. ...

मनगाव ग्रामपंचायतीचे नाली बांधकाम निकृष्ट
कुचना : भद्रावती तालुक्यातील मनगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासक असताना नाली बांधकाम करण्यात आले असून ते अतिशय निकृष्ट असून अपूर्ण आहे. त्याचबरोबर अंदाजे मूल्य सूचीप्रमाणे ते बांधकाम करण्यात आले नसल्याचा आक्षेप गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
सन २०१९-२०२० च्या अंदाज पत्रकानुसार नाली बांधकाम करण्यात आले. मात्र, त्यानुसार काम न करता थातूरमातूर काम करण्यात आले. याच वर्षाच्या अंदाजपत्रकानुसार जुन्या इमारतीसाठी डागडुजीच्या नावाखाली आणि अंगणवाडीच्या रंगरंगोटीसाठी विनाकारण सरकारी पैशाची उधळपट्टी करण्यात आली. हे सर्व काम प्रशासक नेमला असताना ग्रामसेवक व प्रशासक यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. नवीन सदस्य निवडून आल्यानंतर बांधकाम दुरुस्तीची मागणी केली. मात्र, ग्रामसेवक गाडगे यांनी मी ते काम करवून घेतो असे सांगितले. परंतु अजूनपर्यंत काम झालेले नाही.
या सर्व कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सरपंच सुनील खामनकर व नवनियुक्त सदस्यांनी केली आहे.
कोट
या कामाची तक्रार प्राप्त झाली असून आम्ही त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कारवाई करू.
- मंगेश आरेवार, संवर्ग विकास अधिकारी, भद्रावती.
कोट
या बांधकामात जर चौकशीमध्ये काही दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.
- प्रवीण ठेंगणे, सभापती, पंचायत समिती, भद्रावती.