डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करीत पुढे जा : मुनगंटीवार
By Admin | Updated: December 28, 2015 01:27 IST2015-12-28T01:27:34+5:302015-12-28T01:27:34+5:30
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ...

डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करीत पुढे जा : मुनगंटीवार
भेजगाव: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या उत्थानासाठी संघर्ष करति सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांचा संघर्ष आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. या दोन्ही महामानवांच्या विचारांना अंगिकारत पुढे जाण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल तालुक्यातील चिंचाळा येथील छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित म. जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
म. जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व्ही. डी. मेश्राम तर विशेष अतिथी म्हणून आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, सुनील खोब्रागडे, अशोक निमगडे, गुरुदास चौधरी, मेघराज काटकर, प्रवीण खोब्रागडे, सरपंच सुष्मा सिडाम, संस्थेचे अध्यक्ष मुर्लीधर डोहणे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, चिंचाळा गाव आदर्श घडविण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. आमदार नाना शामकुळे यांनी संविधान विरोधकांना संविधानाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)