आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची शंका
By Admin | Updated: September 2, 2015 00:39 IST2015-09-02T00:39:48+5:302015-09-02T00:39:48+5:30
गडचांदुरातील नगरसेविकेच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचा अद्याप विसर पडला नसताना सोमवारी रात्री नांदा येथे डॉ.देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली. ..

आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची शंका
पोलीस मारेकऱ्यांच्या मागावर
दुहेरी हत्याकांडाने पंचक्रोशीत दहशत
आशिष देरकर गडचांदूर
गडचांदुरातील नगरसेविकेच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचा अद्याप विसर पडला नसताना सोमवारी रात्री नांदा येथे डॉ.देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली. या घटनेने सामान्य माणूस हादरून गेला असून पंचक्रोशीत दहशत पसरली आहे.
हे दुहेरी हत्याकांड आर्थिक व्यवहारातून झाले असल्याची शंका व्यक्त केली जात असली तरी अद्याप हत्याकांडाचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून तपासचक्रे फिरविली जात आहेत. मूळचे कोरपना तालुक्यातील कातलाबोडी येथील रहिवासी असलेले डॉ.देवराव जोगी हे वैद्यकीय व्यवसायासाठी ४५ वर्षांपूर्वी नांदा येथे स्थायिक झाले होते. त्यांना तिनही मुलीच असून त्या विवाहित आहेत. त्यामुळे डॉ.देवराव जोगी व त्यांच्या पत्नी सुधा जोगी हे दोघेच घरी असायचे.
प्रार्थनेतील आवाज हरविला
गुरूदेव भक्त असलेले डॉ.देवराव जोगी यांचे दातृत्व मोठे होते. मदतीसाठी त्यांच्या उंबरठ्यावर गेलेला माणूस कधीच रित्या हाताने परतला नाही. प्रत्येकाला ते मदत करायचे. राष्ट्रसंतांची सामुदायिक ध्यान व प्रार्थना हा त्यांचा नित्यक्रम होता. दररोज मंदिरात जाऊन ते भजनं गात त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आवाजाची जणू सवयच झाली होती. मात्र डॉ.जोगी यांच्या जाण्याने प्रार्थनेतील आवाजच हरविल्याची दु:खद भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
युवकांचा दाता
नांदा परिसरात कोणतेही सामाजिक कार्य व धार्मिक उत्सव असो, त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी डॉ.देवराव जोगी यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या युवकांना सदैव मदत करीत असत. त्यामुळे युवकांचा दाता म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.
ठोस धागेदोरे नाही
मंगळवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर श्वान पथकाने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत माग काढला. त्यामुळे मारेकरी तेथून पुढे निघून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मात्र मारेकरी कोण, याचे गूढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतले होते. त्यात चौघेजण होते. मात्र आम्ही टॉवरच्या कामासाठी आलो असल्याचे त्या चौघांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.