दारूबंदीच्या तोंडावर मद्याची दुपटीने विक्री
By Admin | Updated: March 30, 2015 00:39 IST2015-03-30T00:39:02+5:302015-03-30T00:39:02+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दारूबंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना,..

दारूबंदीच्या तोंडावर मद्याची दुपटीने विक्री
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दारूबंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना, मद्यविक्रेत्यांनी आपल्याजवळील साठा संपविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र बंदीच्या नावावर कोणत्याही प्रकारच्या मद्यासाठी दामदुपट दर आकारले जात असल्याने मद्यपींची चांगलीच लूट होत आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी येणार आहे. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तशा सूचनाही दिल्या. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबधीत ठाण्याच्या ठाणेदारांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहे.
कोणत्याही ठिकाणी अवैध दारूविक्री होणार नाही, यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. यासाठी दारूविक्रेत्यांची धावपळ सुरू झाली असून आपल्याजवळील दारूसाठा संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक ते दीड महिन्यापुर्वीच नागपुरातील ठोक दारूविक्रेत्यांनी चंद्रपूरच्या दारूविक्रेत्यांना उधारीवर दारू पुरवठा करणे बंद केले. त्यामुळे बंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना दारूसाठा संपल्यातच असल्याचे दिसते. याचाच फायदा घेत तो, दारूसाठा दामदुपट दरात विक्री करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)