डॉक्टर तुम्हीसुद्धा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:32 IST2017-05-23T00:32:54+5:302017-05-23T00:32:54+5:30
प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. रुग्णसेवेचे व्रत जपतानाच आपल्यातील कलाकाराला वाव देत डॉक्टरी क्षेत्रातल्या अनेकांनी सिनेसृष्टीत आपली चुणूक दाखवली आहे.

डॉक्टर तुम्हीसुद्धा !
प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. रुग्णसेवेचे व्रत जपतानाच आपल्यातील कलाकाराला वाव देत डॉक्टरी क्षेत्रातल्या अनेकांनी सिनेसृष्टीत आपली चुणूक दाखवली आहे. डॉक्टरी पेशातील असेच एक व्यक्तिमत्त्व सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहे. चंद्रपूर येथे सर्जन असलेल्या डॉ. शरयू पाझारे यांनी रुग्णसेवेसोबतच चित्रपटनिर्र्मिती व अभिनयाचे शिवधनुष्य पेलले आहे. शरयु आर्ट प्रॉडक्शन या बॅनरखाली ताटवा या आशयघन मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असून येत्या २६मे ला तो प्रदिर्शत होणार आहे.
ताटवामध्ये डॉ. शरयु पाझारे यांनी नायकाच्या आईची भूमिका साकारली आहे. या निमित्ताने आपल्या अभिनयाची आवड जपत त्यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका सक्षमपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. निर्मिती व अभिनय या दोन्ही आघाड्या सांभाळत आपली नवी इनिंग सुरु करणाऱ्या डॉ. शरयू पाझारे यांना भविष्यातही अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती व विविधांगी भूमिका करायच्या आहेत.
प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमातून समाजातील विषमता मांडण्यात आली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल प्रत्येक जण बोलत असला तरी प्रत्यक्ष कृती व आचरण यातील तफावत हा सिनेमा ठळकपणे अधोरेखित करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरु ण नलावडे यांनी केले आहे. संजय शेजवळ, गौरी कोंगे या जोडीसोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, शीतल राऊत, नूतन धवणे, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत.