खरीप हंगातील पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:32+5:30
२९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला धोका पोहोचला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे.

खरीप हंगातील पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा, चंद्र्रपूर, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. बहुतांश धान उत्पादक शेतकरी असणाऱ्या भागांमध्ये झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण करून तातडीने मदत करावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
२९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला धोका पोहोचला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. भरपाई मिळावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी नुकसानीसंदर्भात महसूल यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, असेही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. नुकताच पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अशा पिकांचे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करावेत. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक काढणीनंतर सुकवण्यासाठी शेतात पसरून ठेवले होते. या शेतकऱ्यांनाही भरपाई मिळेल, यादृष्टीने पिकांचे पंचनामे करून अहवाल तयार करावा.
पीक नुकसान सूचना फार्म ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यासाठी कार्यवाही करावी. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या तालुकास्तरीय प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.