झोपडपट्टीधारकांना बेघर करू नका
By Admin | Updated: May 29, 2017 00:36 IST2017-05-29T00:36:47+5:302017-05-29T00:36:47+5:30
येथील बसस्थानकाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.

झोपडपट्टीधारकांना बेघर करू नका
झोपडपट्टीधारकांची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथील बसस्थानकाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. खोलीकरणातून निघालेली माती तलावाला लागून असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या झोपड्याजवळ टाकली जात आहे. पाटबंधारे विभागाने सौंदर्यीकरणाचा विषय समोर करून झोपडपट्टीधारकांना नोटीस देवून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. यामुळे झोपडपट्टीधारकांनी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी केली.
मूल व परिसरातील गरीब नागरिक येथील भु.मा.क्रं. ८६८ याठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या बांधुन राहात आहेत.
झोपडपट्टीधारकांनी मामा तलावाच्या जागेवर किंवा पाळीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधलेल्या नाही किंवा सौंदर्यीकरणाच्या कामास अडचण निर्माण होईल, असे काहीही कृत्य केलेले नाही.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही वर्षापूर्वी या ठिकाणाचा सर्व्हे केला. परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. पाटबंधारे विभागाने कामाला सुरूवात करण्याआधी जागेचे सिमांकन केलेले नाही आणि कामाला सुरूवात केली. जोपर्यंत जागेचे सिमांकन होत नाही, तोपर्यंत झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सदर झोपडपट्टी कायमस्वरूपी करा, अशी मागणी भागवत कुमरे व झोपडपट्टीधारकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक पारधी, भावेश गोहणे, सचिन बल्लावार, नितील कावळे, मधुकर मोहुर्ले यासह अनेक झोपडपट्टीधारक उपस्थित होते.