ताडोबातील देवदर्शनाला मनाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:55 IST2019-02-14T22:55:27+5:302019-02-14T22:55:51+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने आदिवासी बांधवांनी पर्यटकांचा रस्ता रोखून धरला होता. मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना बफर क्षेत्रातील जुनोना गेटवरून प्रवेश देण्यात आला.

ताडोबातील देवदर्शनाला मनाई करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने आदिवासी बांधवांनी पर्यटकांचा रस्ता रोखून धरला होता. मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना बफर क्षेत्रातील जुनोना गेटवरून प्रवेश देण्यात आला. दरवर्षी हाच प्रकार घडतो. त्यामुळे देवदर्शनासाठी वन विभागाने मनाई करू नये, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेला तातोबा देवाची मूर्ती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आहे. देवाची पूजा करण्यासाठी आदिवासी बांधवांकडून वनविभागाकडे परवानगी मागूनही नाकारली जाते. काही दिवसांपूर्वी शेकडो नागरिकांनी ताडोबात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलीस व वनविभागाच्या कर्मचाºयांनी हा प्रयत्न हाणून पाडला. बुधवारी पुन्हा सुमारे २०० आदिवासी बांधवांनी मोहुर्ली गेटवरून ताडोबात देवाची पूजा करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, प्रवेश नाकारल्याने मोहुर्ली गेटवरच ठिय्या दिला. देवाची पूजा करू देण्यासाठी प्रवेश नाकारत असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांनाही ताडोबात जाऊ देणार नसल्याची भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली. परिणामी, काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
मोहुर्ली गेटवर आदिवासी बांधव आणि वनविभागामध्ये प्रवेशावरून वाद उफाळून आल्यानंतर सकाळी पर्यटकांच्या वाहनांचा रस्ता अडविण्यात आला होता. ताडोबा प्रशासनाने मोहुर्ली गेटवरून जाणाºया पर्यटकांच्या वाहनांना जुनोना गेटवरून रवाना केले. आदिवासींचे दैवत असलेल्या तातोबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी संघर्ष होतो.
तोडगा काढा
ताडोबा प्रशासनाने मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना जुनोना गेटवरून रवाना केले. दरम्यान, वनविभागाने प्रवेश नाकारल्याने मोहुर्ली गेटवरच देवाची पूजा करण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला. परंपरेनुसार देवाची पूजा केली. परंतु, देवाच्या दर्शनाची परवानगी घेण्यासाठी अडवणूक करणे चुकीचे आहे. निसर्ग व वन्य प्राण्यांना कोणतीही बाधा येऊ न देता पूजा केली जाते. त्यामुळे वन विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आदींनी केली.