जिल्हा पाणी संकटाच्या सावटात
By Admin | Updated: August 10, 2014 22:52 IST2014-08-10T22:52:45+5:302014-08-10T22:52:45+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सोडा; सर्वसामान्य नागरिकांचेही समाधान केले नाही. अतिशय कमी आणि तोही टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणी मुबलक प्रमाणात साठू शकले नाही.

जिल्हा पाणी संकटाच्या सावटात
शेतकऱ्यांची चिंता वाढणार : सिंचन प्रकल्पात निम्माच जलसाठा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सोडा; सर्वसामान्य नागरिकांचेही समाधान केले नाही. अतिशय कमी आणि तोही टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणी मुबलक प्रमाणात साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई आणि चारगाव प्रकल्प सोडला तर उर्वरित सिंचन प्रकल्पातील जलसाठा पाहिजे तसा नाही. परिणामी पुढे जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात सापडण्याची भीती आहे.
चंद्रपूर शहरात यंदा प्रारंभापासूनच पावसाने हुलकावणी देणे सुरू केले. मृग नक्षत्र बरसलाच नाही. विलंबाने का होईना, पाऊस येईल, ही आशा होती. मात्र पावसाने ही आशा फोल ठरविली. त्यानंतर हवामान खात्यानेही मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता काय होणार याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वाना वाटू लागली. दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पेरणीच्या कामांना प्रारंभ केला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नंतर बरेच दिवस तो गायबच राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले.
जुलै महिन्यात पाऊस आला. मात्र एकदोन वेळचा अपवाद वगळला तर त्याचे बरसणे रिमझिम स्वरुपाचेच होते. त्यामुळे या पाण्याची बऱ्यापैकी साठवणूक होऊ शकली नाही. परिणामी आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लोटल्यानंतरही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पे अर्धे रिकामेच राहिले. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात दोनचारदा ओव्हरफ्लो झालेले इरई धरण यावेळी ६६.४७ टक्केच भरू शकले. केवळ चारगाव व चंदई हे कमी क्षमतेचे धरणच तुडूंब भरू शकले. इतर धरणाची स्थिती आज चांगली वाटत असली तरी पुढे चिंता वाढविणारी आहे. आसोलामेंढा धरणात ५९.६२ टक्के जलसाठा आहे. घोडाझरी प्रकल्पात ४२.९९ टक्के पाणी आहे. सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर प्रकल्प अगदी १०.२३ दलघमी क्षमता असूनही केवळ ५२.९१ टक्के भरू शकला. लभानसराड प्रकल्पाची हीच अवस्था आहे. ७.३५१ दलघमी क्षमता असून या प्रकल्पातही केवळ ५०.३९ टक्के पाणी आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव व अमलनाला प्रकल्प तर चिंताजनक अवस्थेत आहेत. पकडीगुड्डम प्रकल्पात केवळ १०.५१ टक्के जलसाठा आहे. डोंगरगाव धरणात १६.४४ तर अमलनाला धरणात २२.८८ टक्केच जलसाठा आहे.
सिंचन प्रकल्पातील ही स्थिती आजची वेळ कशीबशी निभावून नेईन. मात्र पुढे पाऊस आला नाही तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. पीक जेव्हा भरात येते. तेव्हा पावसाची सिंचनाची गरज पडते. त्यावेळी शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. आॅगस्ट महिना पावसाचा शेवटचा महिना समजला जातो. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसते. मात्र आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लोटला. मात्र पावसाचा अंदाज नाही. ढगाळ वातावरणही कुठे दिसत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यातील धरणात जेवढा जलसाठा आहे, तो झपाट्याने कमी होणार आहे. आणि त्यानंतर पुढे वर्षभर एवढ्या जलसाठ्यात पाण्याचे नियोजन करताना व उद्योगांनाही सांभाळताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.(शहर प्रतिनिधी)