जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून खडाजंगी
By Admin | Updated: November 24, 2014 22:54 IST2014-11-24T22:54:17+5:302014-11-24T22:54:17+5:30
चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश

जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून खडाजंगी
चंद्रपूर : चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीस व नगरसेविका सुनिता लोढिया यांनी आक्षेप घेत थेट राजीनाम्याचा इशारा दिला. त्यामुळे हा वाद महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दालनात गेला. अखेर प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशावरून निरीक्षकांना चंद्रपुरात येऊन महिला काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी लागली.
माजी महापौर संगिता अमृतकर यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या चिटणीस व नगरसेविका सुनिता लोढिया यांनी तर ही निवड रद्द न केल्यास राजीनामा देऊ, असा इशाराच एका पत्रकार परिषदेतून दिला होता. या निवडीवरून वाद आणखीच वाढत जात असल्याने संगिता अमृतकर यांच्या निवडीला वरिष्ठ पातळीवर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यानंतर महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निर्देशावरून महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वनमाला राठोड व सचिव सीमा भुरे या पक्षाच्या निरीक्षक म्हणून चंद्रपुरात दाखल झाल्या. येथील विश्रामगृहात त्यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.
याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांपुढे आपला रोषही व्यक्त केला. माजी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदा अल्लूरवार यांनी सांगितले की तीन महिन्यांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या सुपूर्द केला होता. त्यानंतर आजपर्यत, पक्षाने आपला राजीनामा स्वीकृत केला की नाही, हे सांगण्याचे सौजन्यही वरिष्ठ नेत्यांनी दाखविले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची कोणालाही आवश्यकता वाटली नाही. महिला काँग्रेसला पक्षाकडून गंभीरतेने घेतलेच जात नसल्याने आपण राजीनामा दिल्याचे अल्लूरवार यांनी निरीक्षकांना सांगितले. वरोरा विधानसभेतून काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या आसावरी देवतळे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याचा आरोप केला.पक्षातील निष्ठावान महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रदेश सचिव सुनिता लोढिया यांनी तर वरिष्ठांच्या या निवडीवरच तिव्र आक्षेप घेतला. जी महिला काँग्रेसची कार्यकर्ती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा व्हीप झुगारून महापौर पदासाठी भाजपाच्या उमेदवाराला मतदान करते, तिलाच प्रदेश काँग्रेस चार दिवसात जिल्हाध्यक्ष कसे काय बनवितात ? वरिष्ठांचे असेच निर्णय होत राहिले तर महिला कार्यकर्त्यांमधील पक्षाप्रति निष्ठा संपुष्टात येईल.
मनपाचे स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांच्या नेतृत्वात माजी महापौर संगिता अमृतकर यांच्या गटानेही निरीक्षक वनमाला राठोड यांची भेट घेतली. पदावर नियुक्ती करण्याची आमची मागणी नव्हती. पक्षानेची ही जबाबदारी सोपविली. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
मनपातील काँग्रेसचे गटनेता संतोष लहामगे यांनी वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)