जि. प. अध्यक्षांच्या कक्षाचे नूतनीकरणाचे काम नियमबाह्यच
By Admin | Updated: March 31, 2017 00:42 IST2017-03-31T00:42:19+5:302017-03-31T00:42:19+5:30
प्रत्येक अधिकाऱ्याला व पदाधिकाऱ्याला अधिकाराप्रमाणे खर्चाचे अधिकार असले तरी शासकीय नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

जि. प. अध्यक्षांच्या कक्षाचे नूतनीकरणाचे काम नियमबाह्यच
चंद्रपूर : प्रत्येक अधिकाऱ्याला व पदाधिकाऱ्याला अधिकाराप्रमाणे खर्चाचे अधिकार असले तरी शासकीय नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अध्यक्षांनी आपल्या कक्षाचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने अशी कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे नूतनीकरणाचे कामच नियमबाह्य असल्याचा प्रतिटोला जि.प.चे उपगटनेते रमाकांत लोधे यांनी लगावला आहे.
रमाकांत लोधे यांनी म्हटले आहे, देवराव भोंगळे यांची २१ मार्च रोजी अध्यक्षपदी निवड झाली आणि २२ तारखेला कक्षाच्या नूतणीकरणाचे काम सुरु केले. याचा अर्थ काम सुरु करण्याअगोदर निविदेची जी प्रक्रिया करावी लागते, ती करण्यात आली नाही. या कामाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता घेण्यात आली नाही व पेपरनिविदा प्रक्रियाही करण्यात आली नाही. नियमाप्रमाणे तीन लाखांच्या वर काम असेल तर ई-टेंडर करावे लागते. एक लाख रूपये साहित्यावर खर्च होणार असेल तरीही ई-टेंडर करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. असे उघड असताना पदाधिकाऱ्याला अधिकार आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. या कामावरील अंदाजपत्रकाची प्रत मागितली असता, कार्यकारी अभियंत्यानी ती तयार नसल्याचे उत्तर दिले. याचाच अर्थ नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. पदाधिकाऱ्यांना किती अधिकार आहेत, हे अध्यक्षांनी समजून घेण्याची गरज व उत्तर देणे अपेक्षित होते. पण प्रक्रिया पूर्ण न करता काम सुरु करणे हुकूमशाही व भ्रष्टाचाराला वाव देणे जि. प. अध्यक्षांकडून झालेले आहे, असा आरोपही लोधे यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)