गुरूजींच्या गैरहजेरीवर जिल्हा परिषद पदाधिकारी भडकले
By Admin | Updated: December 24, 2015 00:57 IST2015-12-24T00:57:11+5:302015-12-24T00:57:11+5:30
अध्यापन व शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहावे,

गुरूजींच्या गैरहजेरीवर जिल्हा परिषद पदाधिकारी भडकले
सभा गाजली : राष्ट्रीय अधिवेशनासाठी १ हजार ८१९ शिक्षकांची हजेरी
चंद्रपूर : अध्यापन व शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहावे, असे शासनाचे परिपत्रक असताना जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८१९ शिक्षक अधिवेशनाच्या नावावर शाळेत गैरहजर राहिले. त्यामुळे गेल्या १३ डिसेंबरपासून अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना ओस पडल्या आहेत. याची दखल घेत बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षकांवर कारवाईच्या मागणीसाठी चांगलाच गोंधळ घातला.
१४ ते २३ डिसेंबर दरम्यान बंगळूरू येथे प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने परिपत्र काढून अध्यापन व शैक्षणिक कामांवर परिणाम होणार नाही, याची दखल घेण्याचे म्हटले होते. मात्र अनेक शिक्षकांनी शैक्षणिक कामे व अध्यापनाचा विचार न करता रजेचा अर्ज टाकून गायब झाले. मात्र यापैकी अनेक शिक्षक अधिवेशनाच्या नावावर घरीच दिसले.
अधिवेनशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांना १४ ते २३ डिसेंबर दरम्यान नैमित्तीक रजा मंजूर केल्याचे ऐकविण्यात आले होते. मात्र ज्यांना नैमित्तीक रजा मंजूर झाली नाही, त्यांनीही अधिवेशनाची वाट धरली. त्यामुळे दोन शिक्षकी शाळेत केवळ एकाच शिक्षकाला चार वर्गाचा भार सांभाळण्याची वेळ आली. शिक्षकांनी केवळ अधिवेशनाचे निमित्त करुन विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शालेय अभ्यासक्रमासह अनेक शैक्षणिक कामांवर परिणाम झाला आहे, हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव व ब्रिजभूषण पाझारे यांनी सभेत लावून धरला.
शिक्षण, समाजकल्याण व स्थायी समितीच्या या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा व समाजकल्याण विभागातर्फे अनुदानावर पाईप वाटप करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)