जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या सावटात

By Admin | Updated: September 10, 2015 00:42 IST2015-09-10T00:42:16+5:302015-09-10T00:42:16+5:30

चंद्रपूर जिल्हा संकटाचा सामना करणारा जिल्हा होऊ लागला आहे. प्रदूषणाच्या खाईत गुदमरणाऱ्या जिल्हावासियांची इतर समस्यापासूनही मुक्ती नाही.

The district is in deep water shortage | जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या सावटात

जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या सावटात

उन्हाळ्यात प्रश्न गंभीर : पावसाळा संपायला आला; मात्र जलसाठे रितेच
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा संकटाचा सामना करणारा जिल्हा होऊ लागला आहे. प्रदूषणाच्या खाईत गुदमरणाऱ्या जिल्हावासियांची इतर समस्यापासूनही मुक्ती नाही. आता तर संपूर्ण जिल्ह्याच येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या सावटात असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. जिल्ह्यातील लभानसराड प्रकल्प सोडला इतर धरणाची स्थिती हवी तेवढी चांगली नाही. भर पावसाळ्यात तुडुंब भरून ओव्हरफ्लो होणारे जिल्ह्यातील धरणे पावसाळा संपायला आला तरी रितेच आहेत. चंद्रपूरची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही ७३ टक्केच जलसाठा आहे. विशेष म्हणजे यावर महाऔष्णिक वीज केंद्रही अवलंबून आहे. एकूण परिस्थितीवरून येणारा उन्हाळा जिल्ह्यात भिषण पाणी टंचाईचे संकट घेऊन येणार, असे दिसते.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक एक ना अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. रस्ते, नाल्या, तप्त उन्हाळा, प्रदूषण, घाणीचा विळखा यासारख्या समस्या त्यांच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. एका समस्येचा निपटारा झाला की दुसरी समस्या आ वासून उभीच राहते.
सध्या चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच त्रस्त करुन सोडले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या आटोपल्या. मात्र प्रारंभी तीन दिवस संततधार स्वरुपात बरसणारा पाऊस अचानक दृष्ट लागावा, असा गायब झाला आहे. तो पुन्हा त्याच लयीने अद्यापही परतला नाही. संपूर्ण जिल्ह्याची पावसाची आकडेवारी बघितली तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८१४.२७० मिमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५.४०६ मिमी आहे, हे येथे उल्लेखनीय.
जुलै महिना हा खरा पावसाचा महिना समजला जातो. मात्र यंदा जुलै महिना पाहिजे तसा बरसला नाही. त्यानंतर आॅगस्टमध्ये तरी पाऊस बरसणार अशी आशा सर्वांना होती. मात्र ही आशाही पावसाने फोल ठरविली. या महिन्यात दोनचारदा दमदार हजेरी लावून पावसाने दडी मारली. जो पाऊस बरसला, त्याने काहीच फरक पडला नाही. शेतकऱ्यांची केवळ ती तात्पुरती सोय झाली. आता सप्टेंबर महिना सुरू आहे. पावसाचा हा अखेरचा महिना आहे. या महिन्यात आणि मागील आॅगस्ट महिन्यात कडाक्याची उन्ह तापत आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस बरसत नसल्यामुळे हळूहळू पाण्याचे मोठे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचीही स्थिती काही चांगली नाही.
११ सिंचन प्रकल्पापैकी असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई आणि अमलनाला या प्रकल्पात चिंताजनक आहे. या अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला म्हणजेच शेतकऱ्यांना तर फटका बसत आहेच; पण सर्वसामान्य नागरिकांना, उद्योगांनाही पुढे मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील धरणासोबतच नदी, नाले, तलावांची स्थिती नाजुक आहे. एरव्ही हे जलस्रोत सप्टेंबर महिन्यात तुडुंब भरलेले असतात. पाण्यामुळे तर अनेक तलाव क्षतिग्रस्त होतात. मात्र यंदा परिस्थिती भिन्न आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळू शकेल, एवढेही पाणी तलावांमध्ये नाही. उपलब्ध पाण्याच्या भरोशावर जिल्ह्यातील नागरिकांना आणखी हिवाळा काढायचा आहे आणि त्यानंतर उन्हाळाही शिल्लक आहे. हिवाळ्याच्या अखेरपर्यंत या जलसाठ्यात किती पाणी शिल्लक राहते, हे आताच सांगणे कठीण असले तरी या वर्षीचा चंद्रपूर जिल्हावासीयांचा उन्हाळा मात्र पाणी टंचाईने होरपळणार आहे, हे खरे. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपूरकरांना इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. म्हणजेच साडेचार लाख लोकांची तहान सध्या इरई धरणच भागवित आहे. मात्र या धरणाची सध्याची स्थितीही बरी नाहीे. १६०.२४५ मीटर क्षमता असलेल्या या धरणात सध्या पावसाळ्यातच केवळ ११८.३४२ मीटर एवढे पाणी आहे. मागील वर्षी जुलैअखेर या धरणात ८४.८७० मीटर एवढे पाणी होते. मात्र यावर्षी ते केवळ ४४.७१ टक्के होते. विशेष म्हणजे, मागील वर्षी आॅगस्टमध्ये आणि पुढेही अधेमधे चांगला पाऊस आल्याने धरणाची स्थिती मजबुत झाली होती. यंदा आॅगस्ट महिन्यातही पावसाने नाराज केले. सप्टेंबर महिन्याचा आठवडा लोटला तरीही दमदार पाऊस नाही. सप्टेंबरमध्ये दरवाजे उघडावे लागत असताना यंदा या धरणात आता ७३.८५ टक्केच पाणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चंद्रपूरकरांनाही पाणी टंचाई जाणवणार आहे.

Web Title: The district is in deep water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.