अवैध होर्डिंगविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम
By Admin | Updated: January 19, 2016 00:36 IST2016-01-19T00:36:35+5:302016-01-19T00:36:35+5:30
२६ जानेवारीनंतर महानगरपालिका क्षेत्रात लागणाऱ्या अवैध होर्डिंग बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, ...

अवैध होर्डिंगविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम
२६ जानेवारीची मुदत : पक्ष पदाधिकारी व मुद्रक प्रिन्टर्स धारकांची बैठक
चंद्रपूर : २६ जानेवारीनंतर महानगरपालिका क्षेत्रात लागणाऱ्या अवैध होर्डिंग बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मुद्रक व प्रिन्टर्स तसेच महानगरपालिका अधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्देश दिले. या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. विजय इंगोले, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मुद्रक प्रिन्टर्स उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अवैध, होर्डिग, बॅनर व पोस्टर्स प्रसिध्द करणाऱ्या व्यक्तीवर, पक्षांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४, २४५ व मालमत्ता विद्रृपीकरण अधिनियम १९९५ अन्वये कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २६ जानेवारी नंतर शहरात लागणाऱ्या होर्डिग, बॅनर व पोस्टर्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे राजकीय पक्ष, मुद्रक व प्रिन्टर्स यांना बंधनकारक असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ठरवून दिलेल्या जागेवरच होर्डिंग लावावे
महानगर पालिका क्षेत्रात जाहिरात लावण्यात येणाऱ्या ठिकाणाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या जागे व्यतिरीक्त होर्डिग, पोस्टर व बॅनर आढळून आल्यास संकेतस्थळावर नागरिकांनी तक्रार कराव्या, असे आवाहन या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
मनपाची कारवाई केवळ फार्स
शहरातील अवैध होर्डिंगच्या विरोधात चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने काही दिवसांपुर्वी कारवाई सुरू केली होती. मात्र ही कारवाई केवळ फार्स ठरली. सद्यास्थितीत जटपुरा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लागल्या आहेत. मात्र येथे होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.
अवैध होर्डिंगमुळे प्रदूषणात वाढ
शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग उभ्या आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. २६ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने ही कारवाई किती दिवस चालणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.