जिल्ह्यात १,६६३ गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:06+5:302016-04-03T03:50:06+5:30
जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात १,६६३ गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर
आणेवारी ५० पैशाखाली : शेतकऱ्यांना मिळणार सवलतीचा लाभ
चंद्रपूर : जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार ६६३ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शासनाच्या २० आॅक्टोंबर २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेवून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट मिळणार असून, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट मिळणार आहे.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
खरीप गावाची पैसेवारी ५० पैशाच्या आत असणाऱ्या गावांची तालुकानिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)