दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण
By Admin | Updated: April 8, 2016 00:59 IST2016-04-08T00:59:11+5:302016-04-08T00:59:11+5:30
जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेने एक नवी योजना अमलात आणली.

दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण
जिल्हा परिषदेची योजना : सतीश वारजूकर यांचा पुढाकार
चंद्रपूर : जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेने एक नवी योजना अमलात आणली. बुधवारी चिमूर विधानसभा क्षेत्रातील दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या ट्रॅक्टरमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकासाचा निधी शिल्लक होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांना दिले. दरम्यान, या निधीचा फायदा थेट ग्रामपंचायतींना व्हावा, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी ग्रामपंचायतींना ट्रॅक्टर वितरित करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून यासाठी तयार केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून गावांची यादी सादर केली.
बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते मुंबई ग्रामपंचायत जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० चे नियमाअंतर्गत चिमूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिमूर व नागभीड तालुक्यातील भिसी, उसेगाव, वाहनगाव, जवराबोडी, कवडशी डाक, मांगलगाव, आलेवाही, कोर्धा, बामणी, शंकरपूर या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या ट्रॅक्टरसाठी जिल्हा परिषदेमधून ५ टक्के व्याज दराने १५ वर्षाच्या परतफेडीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीचे ट्रॅक्टर मिळाल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाही वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाला जि.प. पदाधिकारी, अधिकारी, संबंधित दहा गावातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)