बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

By Admin | Updated: October 19, 2015 01:38 IST2015-10-19T01:38:43+5:302015-10-19T01:38:43+5:30

येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले.

The distribution system of electricity distribution company in Ballarpur | बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

एका महिन्याचे बिल १३ हजार : न्यायासाठी ग्राहकाची पायपीट
बल्लारपूर : येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले. यामुळे वीज ग्राहकात असंतोष पसरला असून यासंदर्भात महावितरण कंपनी कार्यालयाचा न्यायासाठी उंबरठा गाठला. मात्र मागील आठ महिन्यांपासून त्यांना न्याय मिळाला नाही. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.
येथील गौरक्षण वॉर्डातील राजू कुंचलवार यांनी घरगुती वापरासाठी डिसेंबर २०१४ मध्ये वीज मीटर घेतला. त्यांना पहिल्याच महिन्यात १ हजार ३१८ युनिट वापर झाल्याचे वीज देयक देण्यात आले. महावितरण कंपनीने या वीज ग्राहकांवर १३ हजार २९० रुपये वीज शुल्क आकारुन अकलेचे दिवे तोडले. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता बल्लारपूर कार्यालयात १७ मार्च २०१५ रोजी अर्ज सादर करुन न्याय देण्याची विनंती केली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत लक्ष दिलेच नाही.
अशातच अधिकाऱ्यांची राजू कुंचलवार यांना १३ हजार ५५० रुपये वीज शुल्क भरण्यास प्रवृत्त केले. विजेची गरज म्हणून त्यांनी पूर्ण रक्कम भरली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे येणाऱ्या बिलात बील कमी करण्याचे आश्वासन दिले. नवीन वीज मिटरच्या रिडिंगनुसार वीज देयक आकारले जाणार, याची शाश्वती दिली. मात्र अद्यापही नवीन मीटर रिडिंगनुसार रक्कम कमी करण्यात आलेली नाही. यामुळे वीज ग्राहकात तीव्र नाराजी पसरली आहे.
अशातच महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जास्त युनिट वापरल्याचे दाखविणाऱ्या मीटरची तपासणी करण्यासंदर्भात मीटर जमा केला. त्यासाठी ६ आॅक्टोबर २०१५ ला अर्ज सादर करुन मीटर तपासणीचा व कोणत्या दिवशी किती युनिट वापरण्यात आले, याची माहिती मागविण्यात आली.
त्यानुसार राजू कुंचलवार यांना कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी मीटर बरोबर असल्याचे सांगून परत पाठविले. मात्र ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या वीज वापराचा अहवाल देण्यास महावितरण कंपनीने नकार दिला. वीज युनिट वापर झाल्याबाबत तपासणी करणारी यंत्रणा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकाला १३ हजार ५५० रुपये एका महिन्याचे वीज बिल भरावे लागले, ही ग्राहकांची पिळवणूक आहे. यामुळे वीज ग्राहकात संताप पसरला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वीज ग्राहकाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The distribution system of electricity distribution company in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.