चंद्रपूर : नववर्षाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही प. पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने दारू व्यसनमुक्तीवर जनजागृती पत्रक व दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर बसस्थानकासमोर पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प. पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यसनमुक्तीचे प्रदेश सचिव संजय बुटले, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानोरकर, कोषाध्यक्ष पंडित काळे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी जि. प अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, कोणतेही व्यसन बंदीमुळे माणसाच्या शरीरातून नष्ट होत नाही. तर कार्यापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून शरीरातून मुक्त होत असते. या संघटनेच्या माध्यमातून समाजाला मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर संघटनेचे अध्यक्ष अनिल डोंगरे यांनी संघटनेचे उद्दिष्ट व कार्य सांगताना व्यसनाच्या आहारी गेलेला समाज व्यसनमुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट असून त्यांच्या पूर्ततेसाठी आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी व्यसनापासून दूर राहण्यासाठी जनजागृती पत्रकाचे वितरण करण्यात आले. तसेच नव्या वर्षापासून दारू न पिता दूध पिऊन नव्या जीवनाची सुरुवात करावी, म्हणून दुधाचे वाटप करण्यात आले. संचालन संघटनेचे जिल्हा संघटक बालाजी बोरकुटे यांनी केले. यशस्वितेसाठी राजुरा तालुका अध्यक्ष दिगांबर वासेकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष प्रकाश भोयर, प्रकाश अल्गमकर, बंडू गोहणे, अरुण बावणे, बाबुराव मुंगुले, घुवले, दुधाराम चरडुके आदींनी प्रयत्न केले.