अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू न झाल्याने जनतेत असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:43+5:302021-02-05T07:37:43+5:30
चिमूर येथे शासनाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करीत पदभरतीसुद्धा मंजूर केली. अप्पर जिल्हाधिकारी पदावर दि ३० एप्रिल २० ...

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू न झाल्याने जनतेत असंतोष
चिमूर येथे शासनाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करीत पदभरतीसुद्धा मंजूर केली. अप्पर जिल्हाधिकारी पदावर दि ३० एप्रिल २० रोजी महाराष्ट्र शासनाने आदेशान्वये नियुक्ती केलेली आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेला वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे. खासदार अशोक नेते यांनीसुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. दि. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याकडे आमदार बंटी भांगडिया यांनी लक्ष वेधले आहे.
दि. १५ ऑगस्ट २० रोजी स्वातंत्र्यदिनीसुद्धा ध्वजारोहण अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले नाही. ही मागणी प्रलंबित ठेवल्या जात आहे.
यामुळे चिमूरकर जनतेत असंतोष पसरला आहे. चिमूर क्रांती भूमीचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून रक्तरंजित, तर दि ५ जानेवारी २००५ रोजी चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन झाले होते तेव्हा तहसील जळीतकांड झाले होते.
असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाने चिमूर येथील उपविभागीय कार्यालयात चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची फक्त पाटी लावण्यात आलेली आहे. ही लोकप्रतिनिधी व जनतेची दिशाभूल आहे, असेही आमदार भांगडिया यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर व अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांनासुद्धा दिल्या आहेत.