अधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे कामाचा खोळंबा
By Admin | Updated: January 15, 2016 01:41 IST2016-01-15T01:41:39+5:302016-01-15T01:41:39+5:30
भद्रावती येथील आठवडी बाजार बुधवारी असतो. त्यामुळे याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येत असतात.

अधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे कामाचा खोळंबा
आठ तास बैठक : गरजू नागरिकांची गैरसोय
भद्रावती : भद्रावती येथील आठवडी बाजार बुधवारी असतो. त्यामुळे याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात कामासाठी येत असतात. मात्र ऐन आठवडी बाजाराच्याच दिवशी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीमध्ये मासिक बैठकीचे आयोजन केले. ही बैठक तब्बल आठ तास चालल्याने अधिकाऱ्यांची वाट पाहता पाहता कार्यालय बंद झाले. गरजू नागरिकांना दिवसभर पंचायत समिती कार्यालयात ताटकळत रहावे लागले.
पंचायत समिती येथील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक काल बुधवारला घेण्यात आली. त्याच दिवशी ग्रामीण भागातील कामगारांना आठवडी बाजार बुधवार असल्याने सुट्टी असते. त्याचा फायदा घेत तालुक्यातील घरकूल लाभार्थी, शौचालय लाभार्थी, बचतगट महिला, रोजगार हमी योजनेतील कामगार व इतर नागरिक कामासाठी आले. मात्र सकाळी १० वाजतापासून कार्यालयातील विविध विभागात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. सर्वच मासिक बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक एक ते दोन तास चालणार व आपले काम होणार, या आशेने गरजू नागरिक ताटकळत उभे होते. काही आल्या पावली परतले. मात्र बैठक लांबणीवर जात असल्याचे पाहून येथील सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे, प्रशांत काळे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चिठ्ठीद्वारे सूचना केल्या. मात्र या सूचनेकडे संवर्ग विकास अधिकारी मानकर यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.
त्यामुळे गरजू नागरिक तिथेच अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. मात्र सायंकाळचे ६ वाजेपर्यंत बैठक चालत राहिल्याने २५ ते ३० कि.मी. अंतरावरून कामासाठी आलेले नागरिक अक्षरश: वैतागून गेले. अखेर वेळ झाल्याने कार्यालयही बंद झाले. त्यामुळे पंचायत समितीमध्ये एकही काम होऊ शकले नाही. त्यातच आठवडी बाजारातही नागरिक जाऊ शकले नाही. त्यातच रात्रीची वेळ झाल्याने गावाकडे जाणाऱ्या एसटी बस नव्हत्या. परिणामी अनेकांना बसस्थानकामध्येच रात्र कुडकुडत काढावी लागली. पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी व सभापती यांच्या अरेरावी धोरणामुळे ग्रामीण भागातील सुनील तेलंग, माधव जीवतोडे, बंडू पिंपळकर, कवडू कुमरे, अजाब पाटील, महादेव बुरडकर, मनोहर श्रीरामे, शालिनी मडावी, आशाबाई सिडाम, ममता मडावी, पार्वता आत्राम, कल्पना कोडापे, आदीसह गरजू नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. (शहर प्रतिनिधी)