अनुकंपा उमेदवाराच्या रूजू आदेशाची मुख्याधापकाकडून अवहेलना
By Admin | Updated: March 11, 2015 01:05 IST2015-03-11T01:05:17+5:302015-03-11T01:05:17+5:30
अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे.

अनुकंपा उमेदवाराच्या रूजू आदेशाची मुख्याधापकाकडून अवहेलना
चंद्रपूर: अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी खुद्द शिक्षण खात्याचीच दिशाभूल केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
केळझर येथील आनंद विद्यालयात सुभाष महादेव कानमपल्लीवार यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा दावा होता. या नुसार शिक्षणाधिकारी कार्यालय आणि संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे पत्रव्यवहार केल्यावर तेथील मुख्याध्यापक अनिल मन्साराम कामडी यांनी २ सप्टेंबर २०१४ रोजी सुभाष कानमपल्लीवार यांना लिपिक पदावर रूजू करून घेतले होते. शाळा समितीच्या ठराव क्रांक दोन नुसार रूजू करून घेत असल्याचे पत्रही त्यांनी त्याच दिवशी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविले होते. या काळात लिपिक या नात्याने कानमपल्लीवार यांनी शाळेतील सर्व पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामकाज सांभाळले. मात्र सहा महिने होत आले तरीही मुख्याध्यापकांनी नियुक्ती आदेश काढला नव्हता. एवढेच नाही तर पदमान्यतेचा प्रस्तावही पाठविला नव्हता. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनही यासंदर्भात वारंवार स्मरणपत्र देऊनही मुख्याध्यापकांकडून टाळाटाळच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी १० मार्चला सकाळपाळीतील शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक कामडी यांनी अचानकपणे सेवा समाप्तीचा आदेशच लिपिक सुभाष कानमपल्लीवारच्या हातात दिला. या प्रकाराने भांबावलेल्या लिपिकाने मुख्याध्यापकांना विचारणा केली, मात्र काहीही न सांगता, उद्यापासून शाळेत यायचे नाही, असे सांगून बोळवण केल्याचे कानमपल्लीवार यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)