शिक्षकांचे घरभाडे रोखल्यास अवमान याचिका
By Admin | Updated: August 15, 2016 00:29 IST2016-08-15T00:29:59+5:302016-08-15T00:29:59+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाच्या चुकीचा अर्थ काढून शिक्षकांचा घरभाडे भत्ता रोखण्याचा निर्णय राजुरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

शिक्षकांचे घरभाडे रोखल्यास अवमान याचिका
शिक्षक संघाचा इशारा : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
राजुरा : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाच्या चुकीचा अर्थ काढून शिक्षकांचा घरभाडे भत्ता रोखण्याचा निर्णय राजुरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या संदर्भात म.रा. प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर यांना निवेदन सादर केले आहे. तसेच प्राथमिक शिक्षकांच्या घरभाडे भत्ता रोखण्यात आल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी म.रा. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जे.डी. पोटे यांनी दिला.
राजुरा पंचायत समितीत कार्यरत असलेल्या जि.प.च्या शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबतचा ठराव व घरभाडे पावती न दिल्यास आॅगस्ट पेड इन सप्टेंबर-२०१६ च्या मासिक वेतनापासून देय असलेला घरभाडे भत्ता व नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता स्थगित ठेवण्याचे निर्देश राजुरा पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ५ आॅगस्टच्या पत्रकान्वये दिलेले आहेत. या पत्रकामुळे शिक्षकांकडे प्रचंड नाराजी पसरली असून सदर पत्रकामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प. चंद्रपूर येथील पत्राचा संदर्भ दिलेला आहे. मात्र याबाबत जि.प.मध्ये चौकशी केली असता या पत्रामध्ये घरभाडे भत्ता थकित ठेवण्याचा किंवा कपात करण्याचा कुठलाही उल्लेख नाही. मात्र पं.स. राजुराच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीचा संदर्भ टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर यांची भेट घेवून सदर पत्रक रद्द करण्याबाबत जिल्हास्तरावरुन सूचना देण्याबाबत विनंती केलेली आहे.न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम वि. व जल संधारण विभागाने २६ नोव्हेंबर २०१५ च्या परिपत्रकान्वये सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविलेले आहे.
असे असताना राजुरा पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश न्यायालयाचा अवमान करणारे असून शिक्षकांचे घरभाडे भत्ता व नक्षलग्रस्त भत्ता रोखल्यास संबंधितांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा म.रा.प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार, कार्याध्यक्ष सुभाष बेरड यांचेसह मारोती जिल्हेवार, गजानन कहुरके, काकासाहेब नागरे, विद्या सयाम, बंडू राठोड, राजेंद्र चांभारे, सुनील मामीडवार, सुधीर मोहरकर, विठ्ठल आवारी, जगदीप दुधे, विद्याचरण गोल्हर, सुरेश जिल्हेवार, तामदेव कावळे, आनंदे आदींनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
घरभाडे भत्ता देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
पोटे यांनी निवेदनासोबत प्राथमिक शिक्षकांच्या घरभाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा जळगावचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी ५८२२/२०१४ ही याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ९ आॅक्टोबर २०१५ रोजी निर्णय देताना मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखू नये, असा निर्णय दिलेला आहे. या निर्णयाची प्रतही दिलेली आहे.