वीज वसाहतीच्या सदनिकांची दुरवस्था
By Admin | Updated: March 13, 2015 01:02 IST2015-03-13T01:02:25+5:302015-03-13T01:02:25+5:30
बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र १९८४ पर्यंत कार्यान्वित होते. तद्नंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थलांतर ऊर्जानगर औष्णिक वीज केंद्रात करण्यात आले.

वीज वसाहतीच्या सदनिकांची दुरवस्था
बल्लारपूर: बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र १९८४ पर्यंत कार्यान्वित होते. तद्नंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थलांतर ऊर्जानगर औष्णिक वीज केंद्रात करण्यात आले. तेव्हापासून १०५ हेक्टरचा परिसर ओसाड झाला आहे. आजघडीला वीज केंद्राच्या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वीज वसाहतीच्या सदानिकांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर वीज केंद्र सर्वप्रथम सुरु करण्यात आले होते. उच्च दर्जाचा कोळसा व वर्धा नदीचे मुबलक पाणी यामुळे एकेकाळी या वीज केंद्राला भरभराटी आली होती. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी ३०० पेक्षा अधिक सदानिकांचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी उच्च प्रतीच्या साहित्याचा त्यावेळी वापर करण्यात आला. आजघडीला मात्र यातील केवळ २५ च्या आसपास सदनिकाच सुस्थितीत असल्याचे दिसून येते. येथील सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे राजरोसपणे सदनिकांची दारे व खिडक्या चोरट्यांनी लंपास करण्याचा धडाका सुरु केला आहे.
बल्लारपूर वीज केंद्राचा परिसर तब्बल १०५ हेक्टर परिसरात विस्तारलेला असून सध्या तो ओसाड पडला आहे. १० वर्षांपूर्वी परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी सभोवताल तारेचे कुंपण लावण्यात आले होते. मात्र चोरट्यांच्या तावडीत सापडलेले कुंपण आजघडीला बेपत्ता झाले आहे. सध्यस्थितीत वीज केंद्राचा परिसर चोरांचे आश्रयस्थान बनल्याचे वास्तव आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी या परिसरातून झाली आहे. परिसराच्या सुरक्षतेसाठी नाममात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक त्याला कारणीभूत आहे. आजघडीला एवढ्या मोठ्या परिसरात केवळ २० ते २५ कुटुंबिय वास्तव्याला असून केवळ एक ते दीड एकर परिसरात २२० केव्हीचे उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. उर्वरित परिसरात कंपनीची दोन-तीन कार्यालये सुरू असून यातून कार्यालयीन सोपस्कार पार पाडला जात आहे.
मध्यंतरी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासंदर्भात सुतोवाच केले. त्यानंतर बॉटनिकल गार्डन निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ओसाड परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी शासकीय पातळीवरचे प्रयत्न अद्यापही सार्थकी लागल्याचे दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)
विसापूरच्या व्यापारीपेठेला अवकळा
बल्लारपूर वीज केंद्रामुळे हजारोंवर कर्मचारी विसापुरात त्यावेळी वास्तव्याला होते. विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीज केंद्र असल्याने येथील व्यापारीपेठ जोमात होती. मात्र वीज केंद्र कायमचे बंद पडल्याने येथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. जवळच्या कागद उद्योगात कंत्राटदारी पद्धती आली. काही वर्षातच प्लायवूड कंपनीला टाळे लागले. परिणामी येथील व्यापारीपेठेला अवकळा आली आहे. वीज केंद्र व प्लायवूड कंपनी बंद झाल्याचा परिणाम कामगारांवर व व्यापाऱ्यांवर झाला आहे. दोन्ही उद्योग राजकीय ईच्छाशक्तीचे बळी ठरले आहेत.