प्रेमाच्या नावावर निसर्गाचे विद्रुपीकरण
By Admin | Updated: August 1, 2015 00:31 IST2015-08-01T00:31:55+5:302015-08-01T00:31:55+5:30
प्रेम, असं म्हणतात, प्रेम या शब्दात अफाट शक्ती आहे. जी गोष्ट ताकद व पैशाने करता येत नाही ती गोष्ट प्रेमाने सहज होते.

प्रेमाच्या नावावर निसर्गाचे विद्रुपीकरण
चंद्रपूर : प्रेम, असं म्हणतात, प्रेम या शब्दात अफाट शक्ती आहे. जी गोष्ट ताकद व पैशाने करता येत नाही ती गोष्ट प्रेमाने सहज होते. मात्र सध्या प्रेमाची व्याख्याच फार बदलेली दिसते. प्रेमाच्या नावावर प्रेमीयुगुलांकडून सार्वजनिक मालमत्तेचे सर्रास विद्रुपीकरण सुरू आहे. नैसर्गीक स्थळे, धार्मिक स्थळे, बगीचा आदी ठिकाणी प्रेमीयुगुलांनी केलेले विद्रुपीकरण हे इतरांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून या प्रकारांवर आळा बसणे आवश्यक झाले आहे.
चंद्रपूर शहरात अनेक धार्मिक स्थळे, बगीचा व पुरातन वास्तू आहेत. मात्र या स्थळांना भेटी दिल्यास प्रेमीयुगुलांचे विकृत कृत्य सर्रासपणे दिसून येते. प्रेमाचे प्रतीक म्हणून बागेतील झाडांवर, पुरातन वास्तूच्या भिंतीवर आपली नावे तसेच विविध प्रतिमा कोरल्या जात आहेत. हा प्रकार अलीकडे एवढा वाढला आहे की, पुरातन वास्तू, परिसराची शोभा वाढवणारी झाडेही विदृप होत आहेत.
प्रेमाची ताकद फार आहे, असे म्हटले जात असले तरी आजच्या तरुण पिढीने प्रेमाची ही परिभाषाच पार बदलून टाकली आहे. आजचे बहुतांश प्रेमीयुगल प्रेमाच प्रदर्शन करताना दिसून येतात. मात्र हे प्रदर्शन करत असताना त्याचा परिणाम निसर्गावर होत असेल तर, ही बाब गंभीर आहे.
चंद्रपूर शहर अनेक प्राचिन गडकिल्याने नटलेला आहे. असे असले तरी या किल्यांविषयी पुरातन खातेही उदासिनच दिसून येते. अनेक किल्ल्यांवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. तर अनेक ठिकाणी किल्ले खचत चालले आहेत. यातच आता काही प्रेमीयुगुलांनी प्रेमाचे प्रतिक म्हणून या किल्यांवर कोरीव काम करुन त्यांच्या विदृपीकरणात आणखी भर घातली आहे. अशीच अवस्था शोभा वाढवणाऱ्या जिल्ह्यातील बागांची झाली आहे. जिल्ह्यातील अनेक बागमध्ये शोभेची मोठमोठी झाडे लावण्यात आली आहे. परंतु, यातील अनेक झाडांवर काही प्रेमीयुगुलांनी आपले व पे्रयसीचे नाव कोरल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अनेक झाडांवर दिल, लव, शायरी तसेच अनेक प्रकारचे मजकूर कोरलेले आहेत. तसेच त्या परिसरातील भिंतींवरही अशा प्रकारचे मजकुर पेनीने किंवा रंगीत दगडाने लिहिल्या गेले आहे. प्रेमीयुगुलांच्या या प्रकारामुळे सौंदर्यप्रधान स्थळांच्या सौंदर्याला ग्रहण लागले आहे.
एकीकडे सरकार पर्यटन श्रेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवीन योजना राबविल्या जात आहेत. मात्र तरूणच प्रेमाच्या दिखाव्यापोटी नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करु लागल्याने अशा योजना कितपत यशस्वी ठरणार, हा एक प्रश्नच आहे.
अशा प्रत्येक प्रेमीयुगुलांवर लक्ष ठेवने प्रशासनालाही शक्य नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आता या प्रेमीयुगुलांनाच समोर येण्याची गरज आहे. त्यांच्याकडून होत असलेले विद्रुपीकरण बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांसाठी गर्व वाटण्यासारखे बिलकुलच नाही. प्रेमाचे प्रतिक म्हणून निर्सगाची नैसर्गिकता खराब करण्यापेक्षा एखादे झाड लावले तर पर्यावरणाचे संतूलन राखल्या जावू शकते. नाही तर सुरू असलेले विदृपीकरण हे प्रेमाचेही विदृपीकरणच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हे कसले प्रेमाचे प्रतीक?
सार्वजनीक शौचालय, सिनेमागृह, बाग, कॉलेज या सर्व ठिकाणी असलेल्या शौचालयाच्या भिंतींवर काही प्रेमवीरांकडून मुलामुलींची नावे लिहली आहेत, हे चित्र सर्वत्र दिसते. तर काही ठिकानी छायाचित्र काढलेली आहेत. आता याला प्रेमाचे प्रतीक म्हणावे की, मानसिक विकृती.
सुशिक्षित वर्गाकडूनच घडतात प्रकार
विदृपीकरण करण्यात सुशिक्षित वर्गच पुढे आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी हे देशाचे भविष्य मानले जातात. मात्र याच विद्यार्थ्यांकडून असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकरणांवर आळा बसणे आवश्यक आहे.