फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:06+5:302021-01-09T04:23:06+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल ...

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. यातील काहींचीच महापालिकेकडे नोंद आहे. जागा मिळेल तिथे फलक लावले जात आहे. या फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र यासाठी महापालिका प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.
शहरात फलक लावण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन काही शुल्क अदा करावे लागते. मात्र काही मोजक्याच जाहिरातदारांनी फलक लावण्याची परवानगी घेतली आहे. फुकटे जाहिरातदार महापालिका प्रशासन तसेच सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. शहरातील वीज खांब, चौकातील सिग्नल एवढेच नाही तर वृक्षांनाही या फलकबाजांनी सोडले नाही. नागरिकांचे लक्ष जाईल, अशी जागा शोधून फलक लावल्या जात आहे. यामुळे लक्ष विचलित होऊन वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहराचे सौंदर्यही यामुळे विद्रूप झाले आहे. मात्र महापालिका प्रशासनातील संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्यावेळी जाग आली तरच महापालिका प्रशासन अवैध फलक काढण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.
बाॅक्स
प्रशासनाचे दुर्लक्ष
शहर विद्रपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश आहे. मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. एवढेच नाही तर महापालिकेतील काही पदाधिकारी तसेच नगरसेवकही शहरातील विविध भागात विविध फलक लावून शहर विद्रुपीकरणासाठी हातभार लावत आहे.
वाहतूक सिग्नल, वीज खांबालाही फलक लावल्या जात आहे. रस्त्याच्या कडेला असल्या झाडांवरही फलक असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, हमाविद्यालय फलक लावण्यात अग्रेसर असून काही व्यावसायिक वाट्टेत तिथे फलक लावून मोकळे होत आहे. कारवाई होत नसल्याने सर्वांचेच फावत आहे.
--
होर्डिंगमधून पालिकेची कमाई
महापालिकेने शहरातील विविध जागा होर्डिंगसाठी निश्चित केल्या आहेत. यातून मनपाला मोठ्या प्रमाणत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, काही खासगी व्यक्तींनी फलकाची परवानगी घेतली असून ते महापालिकेकडे यासंदर्भातल करसुद्धा भरतात. महापालिकेने निश्चित केलेल्या काही फलकांद्वारे जनजागृतीसंदर्भात माहिती दिली जात असून अनेकवेळा ते खासगी व्यक्तींनाही दिल्या जात असून याद्वारे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
बाॅक्स
शहरातील जनता काॅलेज, बापट नगर, गांधी चौक, वरोरा नाका चौका, जटपुरा गेट परिसर, बाबूपेठ, बंगाली कॅम्प चौक या व्यतिरिक्त विविध रस्त्यांच्या कडेला तसेच वीज खांब, सिग्नलवरही मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता आहे.
कोट
शहर विद्रुपीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाचे महापालिकेला कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अवैध ठिकाणी लावलेले जाहिरात फलक काढण्याची हिंमत महापालिका दाखवित नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.
-संजय वैद्य
माजी नगरसेवक, चंद्रपूर