ब्रिटिशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था
By Admin | Updated: March 20, 2017 00:33 IST2017-03-20T00:33:27+5:302017-03-20T00:33:27+5:30
येथील ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.

ब्रिटिशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था
कार्यालयातील अनेक पदे रिक्त : नहर दुरुस्त करण्याची मागणी
सिंदेवाही : येथील ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.मागील दहा वर्षापासून या विभागाच्या उपविभागीय निवास्थान व कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्तीकडे तसेच नहर दुरुस्तीकडे व परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयीन इमारत व निवासस्थानाच्या सभोवताल अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून आहे.
सिंदेवाही येथे ब्रिटीश राजवटीतील सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या शासकीय उपअभियंत्याच्या निवासस्थानाला १३५ वर्ष पूर्ण होत आहे. या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटीश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाही वरुन घोडेस्वार होवून ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला ब्रिटीशांनी घोडे बांधण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था तसेच निवासस्थानाच्यापुढे व मागे बगीचा तयार केला होता. तसेच बैठकीकरिता एक मोठा खोलीचे बांधकाम केले आहे. मात्र ब्रिटीशकालीन शासकीय निवासस्थान जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने नवीन निवासस्थान व कार्यालयीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला होता. या उपविभागातंर्गत नवीन निरीक्षणगृह बांधण्यात आले आहे. त्या निरीक्षण गृहात १५ वर्षापूर्वी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व शासकीय अधिकारी मुक्काम करीत होते. परंतु पाटबंधारे विभागाने निरीक्षणगृहातच उपविभागीय कार्यालय थाटले आहे. त्यामुळे निरीक्षणगृह (विश्रामगृह) बंद झाले आहे. त्यामुळे सिंचाई उपविभागीय कार्यालयाची दुर्दशा झाली आहे. तसेच या कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने घोडाझरी सिंचाई उपविभाग कार्यालय रामभरोसे झाले आहे. (पालक प्रतिनिधी)
निरीक्षणगृहातील बगीच्याची दुर्दशा
सिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर घालणारे येथील घोडाझरी निरीक्षण गृहाजवळील बगीच्याची दुर्दशा झाली आहे. सदर निरीक्षणगृह व बगीचा हे सिंदेवाहीकराचे आकर्षण होते. परंतु घोडाझरी सिंचाई उपविभागीय कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे उपविभागीय कार्यालय निरीक्षणगृहात स्थानांतरित करण्यात आले. पूर्वी या निरीक्षण गृहात लोकांची सतत वर्दळ असायची. निरीक्षण गृह बंद झाल्यामुळे या निरीक्षण गृहासमोर असलेला बगीचा ओसाड झाला आहे. या बगीच्यातील विविध प्रकारची फुलझाडे नष्ट झाली आहेत. बगीच्या सभोवताल गवत वाढले आहेत. बगीच्यातील कारंजे व गार्डन लाईन बंद आहेत. आता या बगीच्यात कुणीही फिरकत नाही. याशिवाय परिसरात पथदिवे नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
गडमौशी नहराची दुर्दशा
येथे घोडाझरी सिंचाई उपविभागाअंतर्गत गडमौशी तलावाचे नहर आहे. या नहराद्वारे लोनवाही शिवाजी चौक, जुना बसस्थानक व इंदिरा नगर जवळील शेत जमीनीला पाणी पुरवठा केला जातो. काही महिण्यापूर्वी घोडाझरी सिंचाई उपविभागाने या नहरावरील टाकलेले स्लॅब जेसीबीने काढून टाकले. त्यामुळे नहराच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे पसरलेले आहेत. या नहराला लागून विविध व्यवसायिकांची दुकाने, खासगी दवाखाना, बँक व पतसंस्था आहेत. या परिसरात मातीचे ढिगारे टाकल्यामुळे ग्राहकांना दुकानात जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे.
घोडाझरी सिंचाई उपविभागातंर्गत सिंदेवाही येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान व उपविभागीय कार्यालय इमारतीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग यांचेकडे पाठविला आहे. तसेच गडमौशी नहर दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आले आहे. प्रस्ताव मंजूर होताच नहर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.
- एन.एम. रिजवी, उपविभागीय
अधिकारी घोडाझरी सिंचाई
उपविभाग, सिंदेवाही