मधुमेह, सिकलसेल आजाराच्या औषधांचा पीएचसीत ठणठणात
By Admin | Updated: December 24, 2015 00:53 IST2015-12-24T00:53:44+5:302015-12-24T00:53:44+5:30
ग्रामीण भागातील जनतेला योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मध्यवर्ती गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे.

मधुमेह, सिकलसेल आजाराच्या औषधांचा पीएचसीत ठणठणात
मंगेश भांडेकर चंद्रपूर
ग्रामीण भागातील जनतेला योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मध्यवर्ती गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. या आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून औषध साठा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेह व सिकलसेल आजारावर औषधेच नसल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळा व हिवाळ््याच्या दिवसांत विविध आजाराची लागण होत असते. त्यामुळे या दिवसांत रूग्णालयात रूग्णांची गर्दी पाहायला मिळते. मात्र रूग्णालयातच औषधसाठा उपलब्ध नसेल तर रूग्णांनी कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होतो. सिकलसेल आजारावर मात करण्यासाठी शासनाकडून सिकलसेल जनजागृती सप्ताह पाळला जातो. या आजावर नागरिकांनी वेळीच उपचार करावे, यासाठी त्यांच्यात जनजागृती केली जाते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून या आजाराचे औषध प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आलेले नाही.
सिकलसेल हा आजार लाल रक्तपेशीशी निगडित आहे. सामान्यत: गोल असणाऱ्या रक्तपेशी कोयत्यासारख्या आकार घेतात. म्हणून हा आजार ‘सिकलसेल’ म्हणून ओळखला जातो. या आजारग्रस्त रूग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्ताची नियमीत तपासणी करून ‘कोलीक अॅसीड’ हे औषध दिले. मात्र या औषधाचा पुरवठा गेल्या आठ महिन्यांपासून करण्यात आलेला नाही.
तर मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे, त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात. या आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांत ‘मेटफारमीन’ हे औषध दिले जाते. मात्र या औषधाचा साठाही रूग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रूग्णांना ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन औषध घ्यावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन आर्थिक भुर्दंडही सहन करण्याची पाळी रूग्णांवर आली आहे.
औषधांचा केवळ फलक
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ६७ प्रकारचे औषधे पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून मधुमेह व सिकलसेल आजारावर औषध साठा उपलब्ध नसल्याने रूग्णांमध्ये आरोग्य प्रशासनाप्रति तिव्र असंतोष पसरला आहे. रूग्णालयातून मिळणाऱ्या ६७ प्रकारच्या औषधांचा फलक प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून येते.
रूग्णांवर आर्थिक भुर्दंड
नागरिकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या रूग्णालयात अनेक आजारावर औषधे उपलब्ध नसल्याने रूग्णांना खाजगी औषधालयातून किंवा जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयात येऊन औषध घ्यावे लागते. यामुळे मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागते.
डॉक्टरांचीही
चालते मनमानी
अनेकदा औषधे उपलब्ध असतानाही रूग्णांना औषध बाहेरून खरेदी करण्यासाठी सांगितले जाते. रूग्णालयात औषध साठा आहे किंवा नाही, याची रूग्णांना कल्पना नसते. त्यामुळे डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या मनमानीला रूग्णांना सामोरे जावे लागते.
मधुमेह आजारावरील औषधे ग्रामीण रूग्णालय स्तरावर उपलब्ध आहेत. लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रातही या आजारावरील औषधांचा पुरवठा केला जाईल. सिकलसेल आजारावरील औषध साठ्याची मागणी शासनाकडे केली असून औषध साठा उपलब्ध होताच पुरवठा केला जाईल.
- श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.